पीपीई सुट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:08 PM2020-08-18T22:08:17+5:302020-08-19T00:58:44+5:30
पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सुट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी-अमृतधाम लिंकरोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला.
पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सुट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी-अमृतधाम लिंकरोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला.
यावेळीसुद्धा ओळख पटू नये म्हणून चोरट्यांंनी पीपीई सुट घातलेला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. चोरटे अल्टो कारमधून आल्याचे फुटेजमधून स्पष्ट होते. अल्टो कारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिक पोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रु पयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे. मेरी-अमृतधाम लिंकरोडवरील वरदविनायक मंदिराजवळ आकाश शांताराम बोंडे यांच्या मालकीचे हाय स्ट्रीट मार्ट मॉल आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी एका राखाडी रंगाच्या अल्टो
कारमधून आलेल्या चौघा संशियतांपैकी तिघांनी काहीतरी लोखंडी वस्तूच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करत गल्ला तसेच काजूबदाम असलेले ड्रायफूटचे तीन ते चार पाकिटे चोरी केली. दुकानातील गल्ल्यात अंदाजे तीन हजार रु पयांची रोकड होती तसेच ६ ते ७ हजार रुपयांचे ड्रायफूट असा जवळपास अंदाजे दहा हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षक मॉलच्या मागील बाजूस झोपलेला असताना चोरट्यांनी संधी साधली. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार संदीप शेळके, नितीन जगताप आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुरटे चोर हिरावाडीतील?काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात असलेल्या एका देशी-विदेशी दारू दुकानातून हजार रु पयांची रोकड चोरणारे संशयित व मेरी-अमृतधाम लिंकरोडवरील मॉलमध्ये चोरी करणारे संशयित यांनी पांढऱ्या रंगाचा पीपीई सुट घातल्याने दोघा घटनेतील संशयितांचे वर्णन मिळतेजुळते आहे. हे चोरटे हिरावाडी परिसरातीलच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी रोडवर सराफी दुकान फोडणारे चोरट्याचे वर्णन व गुन्ह्याची पद्धत एकसारखी असल्याचे आढळून येते.