...त्या कर्तव्य परायणतेतून साजरा करतात ‘फादर्स डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:29 PM2020-06-20T22:29:46+5:302020-06-20T22:30:35+5:30
नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झालेलं वडिलांचे प्रेम मुलींना लग्न झाल्यावर जाणवू लागते. त्यातही एखाद्या बाबाला मुलगा नसेलच आणि वार्धक्यात बाबांची संपूर्ण जबाबदारीही मुलीवरच येऊन पडते तेव्हा या नात्यातील ओलावा अधिक प्रकर्षाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. याचाच प्रत्यय राजहंस काका आणि प्रवीणचंद पंड्या यांचे त्यांच्या मुलींसोबतच्या नात्यातून दिसून येतो.

नाशिकमधील ८५ वर्षांचे मधुकर राजहंस एसटीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गंगापूररोड परिसरात एकटेच राहतात. परंतु, त्यांच्या मुलींनी त्यांना गेल्या २० ते २५ वर्षांच्या कालावधीत कधीही एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्यांना मुलगा नसला तरी त्यांच्या तिन्ही मुलींनी त्यांना मुलाची उणीव कधीच भासू दिली नाही. मुलाची सर्व कर्तव्य अगदी चोख पार पाडतानाच तीनही मुलींनी त्यांचा संसार सांभाळत आपल्या वडिलांची जबाबदारीही समर्थपणे पेलली. असे आवाहनही राजहंस काका करतात. तर बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमध्ये मुलांप्रमाणेच मुलीही कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतात. केवळ त्यांना नेहमीच दिशा देणारा वडीलकीचा हात हवा असतो, असे मत दक्षा पंड्या-जोशी यांनी व्यक्त केले. त्यांचे ८० वर्षांचे वडील प्रवीणचंद्र पंड्या मखमलाबाद नाका परिसरात राहतात. परंतु, त्याची सर्वच जबाबदारी दक्षा यांनी अगदी मुलाप्रमाणेच घेतली आहे. वडील म्हणून मधुकर राजहंस आणि प्रवीणचंद्र पंड्या यांनी त्यांच्या मुलींना समाजातील वास्तविकतेचे ज्ञान देतानाच आपल्या परंपरेविषयी दिलेले संस्कार यामुळे राजहंस कुटुंबातील वडील आणि मुलींसाठी येणारा प्रत्येक दिवस हा ‘फादर डे’ म्हणून विशेषच आहे. त्यांच्या मुलींनी वडिलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
तिन्ही मुलींनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. त्यांचा संसार सुखाचा करीत त्यांनी मला कधीही एक टेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. एखाद्या मुलाची सर्व कर्तव्य त्या आजही जबाबदारीने करीत आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
- मधुकर राजहंस, गंगापूररोड
आम्ही पाचही बहिणी वडिलांची जबाबदारी सांभाळत आहोत. त्यात वडील आणि मी नाशिकमध्ये राहत असल्याने मला त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. त्यासाठी कुटुंंबाकडून नेहमीच सकारात्मक पाठबळ मिळत आहे.
- दक्षा पंड्या-जोशी, आरटीओ परिसर.