त्यांनी साजरी केली वासराच्या जन्मोत्सवानिमित्त ‘बारी’!
By admin | Published: September 8, 2015 10:30 PM2015-09-08T22:30:58+5:302015-09-08T22:35:59+5:30
भालूर : दुष्काळी परिस्थितीतही जनावरांप्रती आदरभाव...
मनमाड : ग्रामीण भागात मूल जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी रात्री भजनाच्या कार्यक्रमाचे
आयोजन करून बारी साजरी करण्याची प्रथा असली तरी भालूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या जनावरांच्या प्रती असलेल्या आदरभावनेतून चक्क गायीला झालेल्या वासराची बारी साजरी करून प्राणिमात्रांवर प्रेम करा, असा संदेश दिला आहे.
सध्या दुष्काळी परिस्थीती निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागात शेतकरी आपल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवत असल्याचे चित्र पहावयास मिळते. भालूर येथील शेतकरी नितीन धनगे यांच्याकडे असलेल्या गायीने गोंडस वासराला जन्म दिला. वासराच्या आगमनाने धनगे कुटुंबीयांमधे आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामीण भागात लहान मूल घरात जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी बारी साजरी करण्याची प्रथा आहे.
धनगे कुटुंबीयांनी या वासराची घरातील सदस्याप्रमाणे बारी
साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. धार्मिक विधी आटोपल्या नंतर रात्री भजनी
मंडळाच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरात या उपक्रमाचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. (वार्ताहर)