आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:22 AM2018-04-26T01:22:44+5:302018-04-26T01:22:44+5:30
सटाणा : आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून आत्यासह तिच्या कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आतेभावासह त्याचे दोन्ही भाऊ, आई-वडिलांवर सटाणा पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, तिचा आतेभाऊ संतोष श्रीराम सोनवणे (रा.अजमिर सौंदाणे) हा तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल म्हणून धमकावत होता. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या नाहीतर मी तुम्हाला गावात राहू देणार नाही अशा धमक्या वारंवार देवून सोनवणे कुटुंबीयांनी पिडीत मुलीचे आई, वडील आणि भावाला मारहाण करत आईचा हात देखील मोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनवणे कुटुंबियांच्या धाकामुळे पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी गाव सोडून लखमापूर येथे स्थलांतर देखील केले. मुलीला मुलगा पसंत नसल्याने आम्हाला हे लग्न करायचे नाही असे सांगूनही सोनवणे कुटुंबीयांनी दबाव टाकून थेट मुलीवर अॅसीड टाकण्याची धमकी देत तुमच्या मुलीशी कोण लग्न करतो ते पाहून घेवू असा सज्जड दम भरल्याने अजमिर सौंदाणे येथील संतोष श्रीराम सोनवणे, भगवान श्रीराम सोनवणे, दीपक श्रीराम सोनवणे, मंगलबाई श्रीराम सोनवणे, श्रीराम केदा सोनवणे, यशवंत नवसा नंदाळे, दिनेश यशवंत नंदाळे यांच्यावर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पीडित मुलीने तिच्या आईसह सटाणा पोलीस ठाणे गाठून यापूर्वीच तक्र ार केली होती; मात्र सटाणा पोलिसांनी या गंभीर प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्याने पीडित कुटुंबीयांनी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्र ार केल्याने पोद्दार यांनी सटाणा पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.