व्हीप टाळण्यासाठी त्यांनी प्रवेशद्वाराशीच ठेवले बॉडीगार्ड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:27 AM2019-11-17T00:27:41+5:302019-11-17T00:28:27+5:30
अटी-शर्ती लादणाऱ्या काही भाजप नगरसेवकांनी आधी महापौरपदाचा उमेदवार कोण ते सांगा, मगच येतो असे सांगितल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली.
नाशिक : अटी-शर्ती लादणाऱ्या काही भाजप नगरसेवकांनी आधी महापौरपदाचा उमेदवार कोण ते सांगा, मगच येतो असे सांगितल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली.
महापौरपदाच्या निवडणुकीला आता खरी रंगत वाढू लागली आहे. पक्षाची उमेदवारी मिळवताना प्रत्येक इच्छुक जणू पक्षाच्या नियमांचे पालन करू अशी शपथ घेतात आणि पहिली दोन-तीन वर्षे सुरळीत झाल्यानंतर पक्षाला कोणी मोजत नाही. सध्या सत्ताधारी भाजपात हेच होत आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मूळ भाजप कार्यकर्त्यांपेक्षा आयाराम आणि नवख्यांना संधी देण्यात आली. तीच आता पक्षाला अडचणीची ठरू लागली आहे. शनिवारी (दि.१६) नगरसेवकांची जमवाजमव करून त्यांना आणताना पदाधिकाºयांची कसरत झाली, तीन-चार जणांचे दूरध्वनी बंद होते, तर एका नगरसेवकाने आपले घर बंद ठेवले आहे. दुसरीकडे विषय पत्रिका किंवा पक्षादेश आणून कोणी घरावर चिटकवू नये यासाठी म्हणे घराभोवती बॉडीगॉर्ड ठेवले आहेत. पक्षादेश ठीक परंतु महासभेची विषयपत्रिका टाळल्यास काय करायचे याबाबत महापालिकेचा नगरसचिव विभागप्रसंगी जिल्हाधिकारी तथा महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे पीठासन अधिकारी यांचा सल्ला घेणार आहे. त्यांचे निर्देश असल्यास पोलीस संरक्षणात विषयपत्रिका देऊन पंचांची स्वाक्षरी घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
या निवडणुकीत हाच एक प्रकार नाही तर अनेक प्रकार चर्चेत आहेत. सहलीच्या निमित्ताने नगरसेवकांवर नजर ठेवण्यात येत असल्याने अनेकांनी विविध कारणे देऊन टाळाटाळ केली. भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला महापौरपदी उमेदवारी मिळण्याची शंका वाटत आहे.
कुटुंब गेले सहलीला..
भाजपचे एकूण ६५ नगरसेवक आहेत. मात्र सहलीवर ४८ गेले आहेत. परंतु त्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेतले असून, नगरसेवकांवर नजर ठेवण्यासाठी काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेण्यात आले आहेत. या सर्वांची संख्या ११५ वर गेली आहे. निवडणुकीतील अनेक नगरसेवक जिवाची निवडणूकदेखील करीत असतात. हा अनुभव अर्थातच नवा नाही. शिवसेनेने मात्र नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना बरोबर नेण्यास मनाई केली आहे.