कोरोनाने दगावलेल्यांवर ‘ते’ करतात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:27 PM2020-08-19T22:27:23+5:302020-08-20T00:21:29+5:30
मालेगाव : कोरोनाने दगावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे नातलग व स्वकीयही पाठ फिरवित असताना शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव हे कोविड-१९ने दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी कुटुंबाकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यानंतर बाधिताला येणारे अनुभव कटू असतात. कोरोनावर मात करून अनेकजण घरीही परतले आहेत, तर दुर्दैवाने काहींचा यात मृत्यू झाला आहे. मृतांवर शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांना बाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री-अपरात्री रुग्णवाहिकेचा चालक किंवा मृताचे नातलग फोनद्वारे संपर्क साधून अंत्यसंस्काराची गळ घालतात. जाधव कोणताही संकोच न बाळगत तत्काळ स्मशानभूमीत दाखल होत मृताचा अंत्यविधी करतात.
मूळचे सटाणा येथील रहिवासी असलेले जाधव यांचे वडील जगन्नाथ जाधव पोलीस खात्यात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते कुटुंबीयांसमवेत मालेगावी स्थायिक झाले. दत्तात्रय जाधव १५ वर्षांपासून समाजकार्य करीत आहेत. सध्या पीपीई किट घालून ते अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडतात. यावेळी त्यांना कुटुंबीयाकडून विरोध होतो; मात्र ते त्यांची समजूत काढून आवश्यक काळजी घेत हे कार्य करतात. कोरोनायोद्धा म्हणून त्यांच्या कार्याचा अनेक संघटनांच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.