‘त्यांनी’ घेतली कोरोनाने पितृछत्र हरपलेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:52+5:302021-05-20T04:14:52+5:30
सिन्नर : सुमारे २१ वर्षं अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीची शिक्षणाची जबाबदारी उच्चशिक्षित दांपत्याने स्वीकारली आहे. ...
सिन्नर : सुमारे २१ वर्षं अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीची शिक्षणाची जबाबदारी उच्चशिक्षित दांपत्याने स्वीकारली आहे. शिवाय स्वतःचे घरही संबंधित कुटुंबीयांना राहण्यासाठी देऊ केले आहे. या निर्णयाचे माध्यमिक शिक्षक संघासह तालुकावासीयांकडून स्वागत केले जात आहे. प्रमिला देवदत्त पोटे व देवदत्त पोटे या दांपत्याने समाजापुढे आदर्श उभा केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
धोंडबार येथील माध्यमिक शाळेत २१ वर्षं अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या केशव रहाटळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अल्पशा मानधनामुळे ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांची दोन मुले व मुलीचे उच्चशिक्षण सुरू आहे. पत्नी विड्या बांधून घरखर्च करत होती. अतिशय हलाखीचे दिवस असूनही ज्ञानार्जनाचे काम अविरत केले. त्यामुळे त्यांच्या पश्चात मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी एस. बी. देशमुख यांनी मदतीसाठी आवाहन केले होते.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत असलेल्या प्रमिला पोटे व पोलीस अधिकारी असलेल्या देवदत्त पोटे या दांपत्याने रहाटळ यांच्या प्रथमा या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. ती इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. शिक्षक संघाचे देशमुख, हरिराम शिरोळे यांच्याशी त्यांनी याबाबत चर्चा केली. याशिवाय मनेगाव येथील घरही रहाटळ यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी देण्यास हे दांपत्य पुढे आले आहे.
मृत्यू झालेल्या रहाटळ यांच्या २१ वर्षं विनाअनुदानित सेवेचा विचार करता सरकारने त्यांच्या पत्नीस अनुकंपा तत्त्वावर नोकरीस घ्यावे, पाच लाखांची तातडीची मदत मिळावी, सरकारकडून ५० लाखांचे विमाकवच मिळावे यासह भविष्य निर्वाह निधीच्या रकमा त्यांच्या खाती जमा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव देशमुख यांनी दिला आहे.