फसवणूक करीत चोरट्याने २.१९ लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:14+5:302021-09-05T04:18:14+5:30
त्र्यंबकेश्वर : आई, तुमचे घर बांधण्यासाठी साडेतीन लाखांचे कर्ज बँकेने मंजूर केले आहे. फक्त १ पेपर तुमच्या कपाटात राहिला ...
त्र्यंबकेश्वर : आई, तुमचे घर बांधण्यासाठी साडेतीन लाखांचे कर्ज बँकेने मंजूर केले आहे. फक्त १ पेपर तुमच्या कपाटात राहिला आहे. तो नेण्यासाठी मला नानांनी घरी पाठविले आहे. ते माझ्या ओळखीचे आहेत. मी बँकेचा माणूस आहे, असे म्हणून म्हातारीला कपाट कुठे आहे, हे विचारून पेपर आणायला गेला आणि कपाटातील ५० हजार रुपये व चार तोळे सोन्याची पोत, दीड तोळे वजनाची सोन्याची नथ व चार हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तोरड्या असा सुमारे दोन लाख एकोणीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून पोबारा केला.
या प्रकरणी फिर्याद गणेशगाव नाशिक येथील दौलत झावरु कापसे (४२ धंदा शेती) यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादी कापसे यांची वृद्ध आई हिला खोटे सांगून तिचा विश्वास संपादन करून, अज्ञात आरोपीने आपला कार्यभाग साधला असून, त्र्यंबक पोलिसांनी आरोपी विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी समक्ष भेट देऊन वस्तुस्थिती माहिती घेतली. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तपास कामास सुरुवात केली आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राणी डफळ अधिक तपास करीत आहेत.