चोरट्यांच्या टोळीस अटक
By admin | Published: June 25, 2017 12:25 AM2017-06-25T00:25:43+5:302017-06-25T00:25:55+5:30
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीस पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीस पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाइल, दुचाकी व शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे़ विशेष म्हणजे या आठ जणांच्या टोळीमध्ये चार अल्पवयीन बालकांचाही समावेश असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक सारिका अहिरराव व पथकातील कर्मचाऱ्यांना या टोळीबाबत माहिती मिळाली होती़ त्यानुसार विसे मळा परिसरातील गस्तीमध्ये दोन जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीचा उलगडा झाला़ पोलिसांनी संशयित पंकज नरेंद्र टोंगारे (२१, रा. पंचवटी), प्रतीक गणेश धात्रक (२१, रा. रविवार पेठ), जितेंद्र रवींद्र शेटे (२०, रा. घासबाजार) व रवि अण्णा उगले (२२, पंचवटी) या चौघांना अटक केली असून, चार अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी या आठही संशयितांची झडती घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर ते शस्त्राचा धाक दाखवून लूटमार व चोऱ्या करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या आठ जणांच्या घरी झडती घेतली असता चोरीचे १४ मोबाइल, चार दुचाकी, सात कोयते, चॉपर व चाकू असा सुमारे दोन लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सारिका अहिरराव, भालेराव आदींनी ही कारवाई केली़