देवळा येथे चोरट्यांनी दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:22 AM2020-09-23T01:22:23+5:302020-09-23T01:24:14+5:30
अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या वेळी शहरातील चार दुकानांचे शटर तोडले, तर तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून, देवळा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. शहरासह तालुक्यात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
देवळा : अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या वेळी शहरातील चार दुकानांचे शटर तोडले, तर तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून, देवळा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. शहरासह तालुक्यात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास देवळा- कळवण रस्त्यावरील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हिरे आॅटो, आनंद अॅग्रो, ओमश्री हाडर्वेर, बीव्हीके गोडाऊन आदी दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने हजारो रूपये किमतीचे सामान व रोकड चोरून नेली. ह्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरी
करत असतानाचे फुटेज मिळाले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेण्यात येत आहेत.
शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या तसेच घरफोडी व भुरट्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी
देवळा शहराला पाच वर्षांपूर्वी तंटामुक्त गावाचा शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून मोठा गाजावाजा करीत शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. यामुळे पोलीस यंत्रणा सजग असल्याचे व शहरातील रोडरोमिओंना तसेच चोरीच्या घटनांना आळा बसू लागल्याचे चित्र सुरूवातीला दिसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु कालांतराने सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर गुन्हेगारांचे फावले. शहरात नवीन सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.