चोरट्यांना पकडले रंगेहाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:49+5:302021-09-22T04:17:49+5:30
सिन्नर : बारमधून मद्याच्या बाटल्यांसह एलईडी चोरून नेत असताना परिसरातील सतर्क रहिवाशांमुळे दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. ...
सिन्नर : बारमधून मद्याच्या बाटल्यांसह एलईडी चोरून नेत असताना परिसरातील सतर्क रहिवाशांमुळे दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील उद्योग भवन परिसरातील स्वागत बार ॲन्ड रेस्टॉरंटजवळ सोमवारी (दि.२०) मध्यरात्री २ च्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित चोरट्यांकडून गोणीत भरलेल्या दारूच्या बाटल्यांसह एक एलईडी पोलिसांनी जप्त केला आहे.
उद्योग भवन परिसरातील स्वागत बार ॲन्ड रेस्टॉरंटचे पुढील बाजूचे शटर उचकवून तिघा चोरट्यांनी आत प्रवेश केला व सीसीटीव्हीसाठी जोडलेला एलसीडी वायर्स तोडून चोरट्यांनी तो ताब्यात घेतला. सोबत आणलेल्या गोणीत हॉटेलमधील महागड्या दारूच्या बाटल्या भरल्या, त्याचवेळी बाजूला राहणाऱ्या काही रहिवाशांना हॉटेलमध्ये चोरटे आल्याचा संशय आला व त्यांनी तातडीने त्याबाबत पोलीस ठाण्यास दूरध्वनीवरून कळवले. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व हॉटेलमधून मुद्देमाल घेऊन चोरटे बाहेर पडत असतानाच पोलीस पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन एक चोरटा फरार झाला.
पोलिसांनी चोरट्यांकडून एक एलसीडीसह सहा महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या, तर गोणीत भरून ठेवलेल्या इतर दारूच्या बाटल्याही ताब्यात घेतल्या.