सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 06:31 PM2020-02-04T18:31:01+5:302020-02-04T18:31:18+5:30
विंचूरची घटना : पावणे पाच लाख रुपयांची रक् क म लंपास
विंचूर : येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चार लाख ७५ हजार ५०० रु पयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरटयांनी एटीएमबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा रंग फेकून पुढचा कार्यभाग उरकल्याचे निदर्शनास आले आहे. भल्या सकाळी चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील येवला रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी (दि.४) सकाळी सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान चोरट्यांनी फोडले. यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडून चार लाख ७५ हजार ५०० रु पयांची रोख रक्कम चोरु न नेली. यावेळी सतर्कता म्हणून चोरट्यांनी एटीएम बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळा रंग टाकून चेहरे लपविण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजता एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएम मध्ये चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सदर ग्राहकाने बॅकेच्या शाखा व्यवस्थापकास भ्रमनध्वनीद्वारे संपर्कसाधून चोरीची माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापक स्वप्नील सोनजे यांनी लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी घटनास्थळी भेट दिली असता एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेºयावर काळ्या रंगाचा शिडकावा करत कॅमेरा काळा केलेला आढळुन आला. चोरट्यांनी एटीएम कक्षात शिरकाव करत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले आणि रक्कम घेऊन पोबारा केल्याचे उघडकीस आले.
एटीएममधील १२ लाख वाचले...
बँकेने सोमवारी (दि.३) ३० लाख रु पये एटीएम मध्ये भरले होते. त्यापैकी ग्राहकांनी १३ लाख २४ हजार पाचशे रु पये काढले होते. उर्वरित सोळा लाख ७५ हजार ५०० रु पयांपैकी चोरट्यांनी चार लाख ७५ हजार ५०० रु पयांवर डल्ला मारला. सुदैवाने एटीएम पेटीमध्ये बारा लाखाचा कप्पा चोरटयांना फोडता न आल्याने बँकेचे १२ लाख रु पये वाचले. या अगोदरही याच एटीएमवर चोरट्यांनी दोन वेळा डल्ला मारला होता. मात्र स्टेट बँकेने त्यानंतरही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नाहीत.