नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:33 PM2020-02-09T18:33:42+5:302020-02-09T18:34:41+5:30
शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे.
नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून विविध भागांमधून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किंमतीच्या पाच दुचाकी गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भद्रकाली, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित दुचाकीमालकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मेनरोडवरील बिवलकर लेनमध्ये राहणारे चंद्रभान राजाराम विश्वकर्मा (३५,रा.बिवलकर लेन) यांनी त्यांची पॅशन-प्रो दुचाकी (एम.एच.१५ईडी ४९६२) त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या वाहनतळात उभी केली होती. तरीदेखील चोरट्यांनी रात्रीतून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसरी घटनाही सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जिल्हा रूग्णालयाच्या वाहनतळात घडली. वाहनतळा फिर्यादी अनंत टी. गायकवाड यांनी त्यांची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी (एम.एच.४१ वाय ४५९२) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मनपाच्या जिजामाता रूग्णालयाच्या पाठीमागील बाजूने आशिषकुमार रमेशराव वराडे (४२,रा.तांबे मळा, मखमलाबादरोड, पंचवटी) यांची दुचाकी (एम.एच.१५ बीएल ९९७५) अज्ञात चोरट्याने भरदिवसा चोरून नेली. त्यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात १५ हजारांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी गावातील सरगम अपार्टमेंटच्या वाहनतळातून मिलिंद श्यामकुमार मडगुंडी (२४) यांच्या मालकीची ५० हजार रूपये किंमतीची केटीएम दुचाकी (एम.एच १५ जीक्यू ४३४१) अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील माऊली चौक, दत्तनगर येथून आपसिंग वसावे (३२) यांची यामाहा-आर१५ ही दुचाकी (एम.एच१५ जीएस७७६६) त्यांनी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या वाहनतळात व्यवस्थित लॉक करून ठेवली असतानाही अज्ञात चोरट्यांनी ती लांबविली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राहत्या घराच्या आवारातही दुचाकी असुरक्षित
नाशिककरांच्या राहत्या घराच्या आवारातील वाहनतळातदेखील त्यांची वाहने सुरक्षित राहत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे. केटीएम, यामाहा, अव्हेंजर यांसारख्या स्पोर्टी लूकच्या बाइकवर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे.