तीन लाखांच्या सोन्याच्या माळेवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:46 AM2020-11-30T00:46:11+5:302020-11-30T00:47:02+5:30
दिवाळी सण संपल्यानंतर सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, कळवण शहरातील सावरकर चौकात महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
कळवण : दिवाळी सण संपल्यानंतर सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, कळवण शहरातील सावरकर चौकात महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
नंबर प्लेट नसलेल्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांच्या जोडीने सोनसाखळी चोरली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. दुचाकीचालकाने पांढरा शर्ट व मास्क लावला असून, पाठीमागे बसलेल्या महिलेने चेहऱ्यावर कापड बांधलेला होता. याप्रकरणी कळवण येथील कळवण वाणी समाजाचे अध्यक्ष, व्यापारी महासंघाचे संचालक सागर खैरनार यांनी फिर्याद दिली असून, त्यांची आई मीना सतीश खैरनार या सावरकर चौकातील घरातून सायंकाळी ५ वाजता भाजीपाला आणण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पुरुष व महिला या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन लाख २५ हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम वजनाच्या गळ्यातील माळ जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. ही घटना गजानन नागरी पतसंस्थेचे संचालक एकनाथ वालखडे यांच्या गोविंद वेडू वालखडे किराणा जनरल समोर घडली. खैरनार यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेऊन चौकशी केली असता सोनसाखळी चोरी झाल्याची घटना घडल्याचे समजले आणि नागरिकांनी गाडीचा पाठलाग केला, मात्र चोरट्यांनी धूम ठोकली. कळवण पोलिसांनी सावरकर चौक, मेनरोड व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून देवळा, नांदुरी, जुना ओतूर रोड परिसरातील वेगवेगळ्या दिशेने धाव घेऊन चौकशी केली. चांदवड येथील घटनेशी साम्य घटना असून, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.