चोरपावलांनी येणाऱ्या दुर्धर आजारांकडे दुर्लक्ष ठरते जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:49 AM2019-01-21T00:49:44+5:302019-01-21T00:50:00+5:30
भारतातील निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न केवळ गंभीरच नसून जीवघेणा ठरणार आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न जितके वैयक्तिक आहेत, तितकेच समाजाला विचारात टाकणारे आहेत.
नाशिक : भारतातील निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न केवळ गंभीरच नसून जीवघेणा ठरणार आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न जितके वैयक्तिक आहेत, तितकेच समाजाला विचारात टाकणारे आहेत. कुटुंबाचा गाडा हा स्त्रियांना ओढावा लागतो. आधुनिक काळात जीवनशैली चुकीची झाल्यामुळे स्त्रियांमध्ये विविध आजारांची मालिका दिसून येते. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये स्त्रियांना अनेक दुर्धर आजार असूनही केवळ कौटुंबिक समस्यांचा, सुखाचा व स्वास्थ्याचा विचार करण्यात त्या दुखणी अंगावर काढून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातून स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, संधिवात अशा नानाविध रोगांच्या शिकार होतात, असा निष्कर्ष वजा मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. स्त्रियांच्या आरोग्याची चर्चा केवळ महिला दिन, नवरात्रोत्सव किंवा थोर महिलांच्या जयंती-पुण्यतिथीला एखाद्या परिसंवादात होते. नंतर वर्षभर त्यावर फारशी चर्चा होत नाही, परंतु शहरांमध्ये मोठी रु ग्णालये असूनही ग्रामीण स्त्रियांप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक जटिल अशी आरोग्य समस्या शहरी स्त्रियांमध्ये आढळून येत आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक विकारांना वाव मिळत असला तरी त्यावर मात करणे शक्य आहे. कारण अशा स्त्रियांमध्ये रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, संधिवात, अनेमिया, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग अशा अनेक आजारांचे प्रमाण वाढलेले दिसते. एकातून दुसरा अशी आजारांची साखळीच निर्माण होते, अशी माहिती मधुमेह तज्ज्ञ डॉ. गौरी दामले यांनी दिली. नोकरी, संसार, स्टेटसच्या कल्पना, सामाजिक अपेक्षा या सगळ्यांत स्त्री पडलेली दिसते. त्यामुळे तिच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. साहजिकच ती वेगवेगळ्या व्याधींची शिकार बनते.
त्यातच कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, या भावनेतून स्वत:च्या आरोग्याकडे आणि आजारांकडे दुर्लक्ष करते. तसेच ते आजार किरकोळ समजून करणे, आजार अंगावर काढणे, आर्थिक विचार घेणे यातून आजार बळावत जातात. त्यासाठी वेळच्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेणे, वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करणे, तसेच आहार-विहार आणि व्यायाम योग्य व नियमित असणे आवश्यक आहे, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
आधुनिक काळात जीवन अत्यंत गतिमान झाल्याने मनुष्याला स्वत:साठीदेखील वेळ उरला नाही. स्त्रियांना तर दिवसाचे २४ तास कमी पडू लागले आहेत. साहजिकच शारीरिक व्याधी वाढू लागल्या आहेत. परंतु कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य आहे. कोणतीही लक्षणे दिसली किंवा नाही दिसली तरी गंभीर आजार असू शकतो. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा असाच भयानक आजार असून, या आजारामुळे भारतात दर मिनिटाला एक महिला मृत्युमुखी पडते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्यांनी आपल्या संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी. - डॉ. सुप्रिया पुराणिक, स्त्रीरोग तज्ज्ञ, नाशिक