लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:27 IST2017-10-23T00:27:20+5:302017-10-23T00:27:26+5:30
लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना खुटवडनगर व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़

लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना खुटवडनगर व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ चोरट्यांनी या दोन घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामा त्र्यंबक भागवत (६४, रा़ रो-हाउस नंबर ३, साईदृष्टी अपार्टमेंट, सीटू भवनच्या मागे, खुटवडनगर, नाशिक) यांनी लक्ष्मीपूजनासाठी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९० हजारांचा ऐवज घरातील हॉलमध्ये पूजेच्या पाटावर ठेवला होता़ पूजा आटोपल्यानंतर रात्री बारा वाजता भागवत कुटुंबीय झोपी गेले़ मध्यरात्रीनंतर पावणे चार वाजेच्या सुमारास भागवत यांना जाग आली असता त्यांना पूजेसाठी ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे तसेच घराची खिडकी उघडी असल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ घरातील व्यक्तींना दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले़ हॉलमधील पूजेच्या पाटावर १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती़ या प्रकरणी भागवत यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेली रोख रक्कम व घरातील एलईडी टीव्ही चोरट्यांनी चोरून नेल्याची दुसरी घटना मुंबई नाक्यावरल रुद्रकार मॉलमध्ये घडली़ प्रिया राकेश मुनशेट्टीवार (३०, काठे गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कार मॉलच्या कंपाउंडमधील ओपन पत्र्याच्या शेडमधील कॅबिनमध्ये घुसून पूजेसाठी ठेवलेली रोख रक्कम व २४ इंची एलईडी टीव्ही असा ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़
तीस हजारांची फसवणूक
एटीएम अकाउंट व एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती घेऊन एका इसमाची तीस हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) घडली़ ओझर रोडवरील साकार ड्रिम्स अपार्टमधील रहिवासी वैभव खैरनार यांना शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास एका संशयिताने ९८९१३१७७०२ या क्रमांकाच्या मोबाइलवरून फोन केला़ या इसमाने टुरिस्ट पॅकेज, एलईडी टीव्ही व कॅशबॅक योजनांच्या नावाखाली खैरनार यांच्या एटीएम अकाउंट नंबरची तसेच एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती घेतली़ यानंतर या दोन्ही अकाउंटमधून २८ हजार ९४५ रुपये परस्पर काढून घेतले़