पाथरे परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ
By admin | Published: February 21, 2016 09:57 PM2016-02-21T21:57:36+5:302016-02-21T22:01:48+5:30
पाथरे परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पाथरे खुर्द शिवारातून गोदावरी डावा कालवा जातो. या भागातील जमीन बागायती असल्याने शेतात वस्ती करून राहणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. दत्तात्रय कचरू चिने, संपत रंगनाथ आभाळे यांच्या शेतातून पीव्हीसी पाइप, जलवाहिनीचे बारे, विद्युतपंप, फ्यूज, केबल, स्टार्टर, पाणी फिल्टर आदि महागड्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसभर शेतात कष्ट केल्यानंतर पुन्हा रात्रभर जागरण करून चोऱ्या टाळण्यासाठी पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पिकांना पाणी देण्याच्या वस्तूंनाच चोरटे आपले लक्ष्य बनवत असल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे. रात्री शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या वेळीच चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जास्तीच्या भारनियमनामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. रात्री उशिरा वीजपुरवठा चालू झाल्यावर शेतीला पाणी द्यावे लागत आहे. अशातच साहित्याची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भुरट्या चोरांच्या दहशतीमुळे कालव्याच्या आवर्तनावरील शेतीही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)