चोरांनी लाखोंची कॅश असलेले एटीएम पळविले, नाशिक पोलिसांनी पाठलाग करताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:48 AM2023-06-05T11:48:49+5:302023-06-05T11:49:28+5:30
लासलगाव येथील विंचूर रोडवर ॲक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ ए टी एम मशीनची तपासणी पहाटे तीन वाजता पोलिसांनी केली होती.
- शेखर देसाई
लासलगाव : विंचूर रोडवरील ॲक्सिस बँकेच्या जवळील चौदा लाख एकोंनंवद हजारांची कॅश असलेले एटीएम पहाटे चार वाजेच्या सुमारास पळविले. परंतू, याची खबर पोलिसांना लागताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. हे पाहून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती अर्टिगातून हे एटीएम रस्त्यावरच फेकून देत पळ काढल्याची घटना घडली आहे.
लासलगाव येथील विंचूर रोडवर ॲक्सिस बँकेची शाखा आहे. या शाखेजवळ ए टी एम मशीनची तपासणी पहाटे तीन वाजता एस आय. नंदकुमार देवढे, देवा पानसरे आणि होमगार्ड डी के.पगारे यांनी केली आणि ते लासलगाव येथे गस्तीला गेले. यानंतर पावणे चार वाजेचे सुमारास या एटीएममध्ये चार आज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. या मशीनला फाउंडेशन नसल्याने अवघ्या पंधरा मिनिटात मशीन हलवले आणि सोबत आणलेल्या चार चाकी वाहनात टाकून ते निघाले.
एटीएम सुरक्षा यंत्रणेकडून सदरच्या घटनेची माहिती लासलगाव शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना मिळाली आणि त्यांनी पोलीस पथकाला पाठविले. पथकाने सीसीटीव्ही पाहून या कारचा पाठलाग सुरु केला. विंचूरकडे चोरटे गेल्याचे लक्षात येताच पोलिसही तिकडे निघाले. तिथला सीसीटीव्ही पाहिला असता ते निफाडकडे गेल्याचे समजले. तिकडे चोरट्यांची गाडी पोलिसांनी गाठली, परंतू पोलीसांना पाहून चोरट्यांनी कारला जोरात ब्रेक मारला व मागच्या डिक्कीत ठेवलेले एटीएम मशीन रस्त्यावर फेकले.
पोलिसांनी या चोरट्यांचा पुढे पाठलाग केला, परंतू ते मिळू शकले नाहीत. पोलिसांनी तातडीने मशीनची तपासणी करून लासलगावचे स पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी संपर्क करून तातडीने नाकाबंदी केली यानंतर मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती नाशिकचे पोलीस उपाधीक्षक सुरेश भामरे तातडीने लासलगाव दाखल झाले. लासलगाव ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.