चोरीच्या कार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By Admin | Published: June 19, 2015 12:07 AM2015-06-19T00:07:26+5:302015-06-19T00:08:05+5:30
बारा कार्स जप्त : युनिट-३ ची कामगिरी; मुंबई, पुण्यातून चोरी
नाशिकरोड : मुंबई-ठाणे-पुणे आदि भागांतून चार चाकी महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट-३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. वाहनचोरीच्या टोळीचा मुंबई कांदवलीतील एका म्होरक्याकडून ५३ लाख रुपये किमतीच्या एकूण १२ चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मुंबई-ठाणे-पुणे आदि भागांतून महागड्या चारचाकी गाड्या चोरून बनावट आरसी बुक (स्मार्ट कार्ड) बनवुन त्या चोरीच्या गाड्या कमीत कमी किमतीत विकल्या जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट-३ चे पोलीस निरीक्षक संजय सानप, हवालदार जाकीर शेख यांना मिळाली. त्यानुसार वाहनचोर टोळीची अधिक माहिती मिळवून सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोंधे, कर्मचारी सुभाष गुंजाळ, संजय मुळक, विलास गांगुर्डे, मोहन देशमुख, इरफान शेख, शांताराम महाले, संतोष कोरडे, राजेंद्र जाधव, दीपक जठार, गंगाधर केदार, आत्माराम रेवगडे यांनी चार दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील दहीसर येथील काशमीरा परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचलेल्या पोलीस पथकाने संशयित दिवाकर शेष आण्णा शेट्टी (वय ४८, रा. कांदीवली, मुंबई) यास ताब्यात घेतले. संशयित दिवाकर शेट्टी याच्याकडून प्रारंभी पाच चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
संशयित शेट्टी याची पोलिस कोठीत पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली, नाशिक येथून चोरलेल्या ५३ लाख रुपये किंमतीच्या ४ इनोव्हा, ३ तवेरा, १ बोलेरो, १ इंडिगो, १ महिंद्रा पिक अप, १ हुंडाई वरणा, १ सेंन्ट्रो अशा एकूण १२ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)