नाशिकमध्ये मोबाईल दुकान फोडण्यासाठी चोरांकडून पॉश कारचा वापर; सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरी टळली
By अझहर शेख | Published: September 15, 2022 04:42 PM2022-09-15T16:42:38+5:302022-09-15T16:42:49+5:30
एम.जी.रोड, वकिलवाडीचा परिसर मोबाइल व मोबाइल ॲसेसेरीजची बाजारपेठ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागात मोबाइल वस्तु विक्रीची विविध दुकाने आहेत.
नाशिक : वकिलवाडी येथील व्यावसायिक संकुलात रस्त्याला लागून असलेल्या एका मेाबाईल दुकानाचे शटर हत्याराने उचकटून चोरी करण्याचा चौघा चोरट्यांचा प्रयत्न सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला. होंडासिटी कारमधून चौघे चोरटे आले व त्यांनी दुकाने शटर तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
एम.जी.रोड, वकिलवाडीचा परिसर मोबाइल व मोबाइल ॲसेसेरीजची बाजारपेठ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागात मोबाइल वस्तु विक्रीची विविध दुकाने आहेत. महागडे मोबाइल, मोबाइल ॲसेसेरीजचा माल दुकानांमध्ये व्यावसायिकांकडून भरलेला असतो. चोरट्यांनी ही बाब हेरून बुधवारी (दि.१४) मध्यरात्री दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास चक्क एका कारमधून चौघे चोर वकिलवाडीत आले. येथील व्यावसायिक संकुलात रोडफ्रन्ट असलेल्या मोबाइल दुकानाजवळ कार रिव्हर्समध्ये आणून उभी केली.
कारचालक आतमध्येच थांबून राहिला. तीघे चोर पाठीमागील बाजून उतरून डोक्यावर टोपी चढवून घेत दुकानाच्या शटरकडे गेले. हातात असलेल्या लोखंडी वस्तूने शटर उचकटण्याचा प्रयत्न करु लागताच आवाजाने वरच्या बाजूस बाल्कनीत बसलेले सुरक्षारक्षक सतर्क होऊन धावत आरडाओरड करत आले. यामुळे चोरट्यांनी चोरीचा डाव पुर्ण न करता कारमधून धूम ठोकली.
नाशिकमध्ये मोबाईल दुकान फोडण्यासाठी चोरांकडून पॉश कारचा वापर; सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरी टळली#Robbery#Nashikpic.twitter.com/2KkN37LH9I
— Lokmat (@lokmat) September 15, 2022
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानमालकाला याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तेदेखील काही वेळेत हजर झाले. येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये चोरीचा हा प्रयत्न संपुर्णत: कैद झाला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजसह आजुबाजुच्या ससीटीव्ही फुटेजवरून पोलिसांकडून अज्ञात चोरांचा शोध घेतला जात आहे.