हिंगणवेढ्याला बिबट्याचा महिनाभरात तिसरा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:26 PM2018-10-27T17:26:17+5:302018-10-27T17:26:36+5:30
गाय ठार : परिसरातील शेतकरीवर्गात दहशत
चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबटयाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून महिनाभरात बिबट्याने तिसऱ्यांदा हल्ला चढवत एका गाईचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपालवाडी येथील साहेबराव धात्रक यांचे श्वान बिबटयाने फस्त केले होते तर राम मंदिर परिसरातील किसन मोरे यांची शेळी ठार झाली होती. आता अशोक तुकाराम धात्रक यांच्या दुभत्या गाईवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
हिंगणवेढे परिसरात वारंवार अशा गंभीर घटना घडत असल्याने संपूर्ण गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे. हिंगणवेढे गावात उसाची शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व ऊसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याकरीता सुरक्षित जागा असल्याने परिसरात बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आले आहे. त्यामुळे शेतमजूर काम करण्यास तयार नाहीत, त्याचा परिणाम सध्या सुरू ऊस तोडी हंगामावर होत आहे. या घटनांची वनविभाग गंभीर दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे