दोडीत आढळला तिसरा कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:51 PM2020-06-16T21:51:27+5:302020-06-17T00:19:57+5:30
सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सिन्नर शहर कोरोनामुक्त असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
सिन्नर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सिन्नर शहर कोरोनामुक्त असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दोडी
येथे कोरोनाबाधित आढळून आलेल्या ५५ वर्षीय इसमाच्या २७ वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला असून, या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोडीत आता एकूण तीन रुग्ण झाले असून, दापूर, देशवंडीनंतर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दोडीपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या लावरे वस्ती येथे वास्तव्यास असलेल्या ५५ वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना आणि बाधित क्षेत्राशीही निकटचा संबंध आलेला नसतानाही सदर इसमास कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभाग बुचकळ्यात पडला होता. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील तीन व्यक्तींना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात २७ वर्षीय तरुणाचाही समावेश होता. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
-------------------
सोमवारी सदर तरुणाचा अहवाल प्राप्त झाला असून, तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले. वडील आजारी असल्याने गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांसमवेत असल्याने त्यास कोरोनाची बाधा झाली असावी, असा अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात दोडीत ५८ वर्षीय इसम पहिला कोरोनाबाधित ठरला होता.
आठवडाभरात दोडीत तिसरा रु ग्ण आढळून आल्याने दापूर, देशवंडी, फुलेनगर पाठोपाठ दोडी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरते की काय ? अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४० रु ग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी केवळ दोन रु ग्ण सिन्नर शहरातील तर ग्रामीण भागातील ३८ रु ग्णांचा समावेश आहे. त्यातील ३२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रु ग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.