सलग तिसऱ्या दिवशी बाधितसंख्या अकराशेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:36+5:302021-03-13T04:27:36+5:30
नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ ...
नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी नाशिक शहरात ३ तर ग्रामीणमधून ४, मालेगाव मनपा क्षेत्रातून १ असे एकूण ८ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१६६ वर पोहोचली आहे.
बुधवारी बाधितांचा आकडा १,३३० पर्यंत, गुरुवारी १,१४० पर्यंत, तर शुक्रवारी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी ११३५ वर गेल्याने आरोग्य विभागासह प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस बाधित आढळण्याची बाब चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील नागरिकांना इशारा देण्यात आला आहेे. या बाधितांच्या मोठ्या संख्येमुळे आतापर्यंतच्या बाधितांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात भर पडू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३० हजार ७१२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २२ हजार १६७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ६३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९३.४६ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९३.०२, नाशिक ग्रामीण ९५.३१, मालेगाव शहरात ८८.३२, तर जिल्हाबाह्य ९१.८१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ७३ हजार ५०८ असून, त्यातील चार लाख ३९ हजार ९६३ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख ३० हजार ७१२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,८३३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
वाढीची हॅट् ट्रीक चिंताजनक
नवीन रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाल्याने महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या ६३७९ पर्यंत पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी झालेली ही वाढ नागरिकांच्या आणि प्रशासनासह आरोग्य विभागाच्या दृष्टीनेदेखील चिंताजनक ठरली आहे. उपचारार्थी रुग्णसंख्या साडेसहा हजारनजीक पोहोचल्याने जिल्हाभरातील बंद करण्यात आलेली अनेक कोरोना सेंटर्स पुन्हा सुरू करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.