तिसऱ्या दिवशीही भाजीबाजार बंदच
By admin | Published: June 4, 2017 02:35 AM2017-06-04T02:35:51+5:302017-06-04T02:36:04+5:30
सुकाणू समितीचा निर्णय नाशिकच्या संपकरी शेतकऱ्यांना मान्य नसल्याने परिसरातील भाजीबाजारात बोटावर मोजण्याइतकेच विक्रेते दिसून आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : राज्यातील शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सुकाणू समितीचा निर्णय नाशिकच्या संपकरी शेतकऱ्यांना मान्य नसल्याने परिसरातील भाजीबाजारात बोटावर मोजण्याइतकेच विक्रेते दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांची तिसऱ्या दिवशीही भाजीविक्रेत्यांअभावी गैरसोय झाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी बंद घोषित केला. या बंदमुळे गुरुवारी (दि. १) व शुक्रवारी (दि. २) नागरिकांची चांगली गैरसोय झाली होती. शुक्र्रवारी (दि. २) रात्री संप मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु नाशिकच्या संपकरी शेतकऱ्यांना मान्य नसल्याने कृषी बाजार समितीत भाजीपाला आला नाही. त्यामुळे बापू बंगला बस थांब्याजवळ, पांडवनगरी रस्त्यावर आणि कृष्णकांत भाजीबाजारात दोन ते तीनच भाजीविक्रेते आढळून आले. त्यामुळे ग्राहकांनी याठिकाणी गर्दी केली होती.