‘तिसरा डोळा’ निष्क्रिय
By admin | Published: June 26, 2016 09:55 PM2016-06-26T21:55:15+5:302016-06-27T00:32:53+5:30
मध्यवर्ती कारागृह : कैद्यांवरील नियंत्रण अजूनही सैल
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कारागृहात महत्प्रयत्नांनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी कॅमेऱ्याचा तिसरा डोळा असतानाही कारागृहातील गैरप्रकार थांबले नसल्याने अद्याप सीसीटीव्हीची संपूर्ण यंत्रणा कारागृह प्रशासनाच्या हाती आली नसल्याचे समजते.
कैद्यांच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकरोड कारागृह नेहमीच चर्चेत राहिले आहे. टोळीयुद्धाबरोबरच कारागृहातील बॅरेकमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडत असूनही यावर आळा बसविण्यास कारागृह प्रशासनाला यश आलेले नाही.कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा प्रशासन करीत असतानाही कारागृहात भ्रमणध्वनी आणि अमली पदार्थ शोध मोहीम राबवावी लागत असेल तर येथील तिसरा डोळा निष्क्रिय असल्याचेच म्हणावे लागेल. यामुळेच कैद्यांचे भ्रमणध्वनीचे जाळे, कारागृहातून हलविली जाणारी सूत्रे, दोन गटांमधील हाणामाऱ्या, तसेच अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असतानाही यात सीसीटीव्हीची भूमिका समोर येत नाही.
वास्तविक या घटनांना आळा बसावा, यासाठीच सुमारे दोन वर्षांपूर्वी कारागृहावर सीसीटीव्हीची नजर ठेवण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षकांनी केली होती. नाशिकरोड कारागृहाला भेट दिल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा आणि कारागृहातील संरक्षण भिंंत अधिक उंच करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र या उपायांचा कोणताही लाभ कारागृहाला झालेला दिसत नाही. कारागृहातील ५२ ठिकाणांहून ६८ सीसीटीव्ही कॅमेरे कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील, अशी तरतूद करण्यात आली होती. प्रारंभी कॅमेरे कार्यान्वित करण्याच्या दराबाबत कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त करीत या निविदेकडे पाठ फिरविली होती. मध्ये बरेच महिने गेल्यानंतर काही महिन्यांनी एजन्सीकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर कारागृहात सीसीटीव्ही लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातदेखील सुमारे १२ सीसीटीव्ही कॅमेरे आणखी मंजूर करण्यात आले. त्यामुळे कारागृह सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्याने सुरक्षिता वाढेल, असे वाटत असताना कैद्यांच्या कारवाया अजूनही सुरूच असताना सीसीटीव्हीची मदत का घेतली जात नाही, असा सवाल निर्माण झाला होता. प्रत्यक्षात ही यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित झाली नसून अद्यापही काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रतीक्षा असल्याचे समजते. कारागृहाकडे संपूर्ण नियंत्रण कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. मात्र अजूनही संंबंधिक कंत्राटदाराकडून संपूर्ण यंत्रणा कारागृह महानिरीक्षकांच्या ताब्यात दिली नसल्याचे कळते. (प्रतिनिधी)