माळेगाव औद्योगिक वसाहतीत साकारणार तिसरे कोविंड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:45 PM2020-08-04T14:45:04+5:302020-08-04T14:45:04+5:30
सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांवर उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरसह इंडियाबुल्स यथील कोवीड केअर सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व नियोजन म्हणून प्रशासनाने माळेगाव औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या टी आय सायकल कारखान्यात तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे.
सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांवर उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरसह इंडियाबुल्स यथील कोवीड केअर सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व नियोजन म्हणून प्रशासनाने माळेगाव औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या टी आय सायकल कारखान्यात तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. याठिकाणी २०० खाटांचे तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
कोरोना बाधितांची संख्या ६०२ वर पोचली आहे. रोज नव्याने रुग्ण वाढत असून औद्योगिक वसाहतीतील कामगार बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अस्तित्वात असलेले दोन कोविड सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने तिसरे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांनी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत नुकतीच बैठक घेतली. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, बबनराव वाजे, राहुल नवले आदींसह उद्योजक उपस्थित होते.
टी आय सायकल कारखाना बंद स्थितीत असून कारखान्याचे प्रशस्त शेड रिकामे पडून आहे. शिवाय रुग्णांसाठी आवश्यक असलेले स्वच्छतागृह उपलब्ध आहे. उद्योजकांच्या मदतीतून इतर आणखी सुविधा उपलब्ध करण्याबाबतही प्रशासनाने दानशूर व्यक्तींसह उद्योजकांशी संपर्क साधला आहे.