कोरोना रुग्णसंख्या कमी होऊनही तिसरा टप्पा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:59+5:302021-06-20T04:11:59+5:30

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या, ...

The third phase persisted despite the reduction in corona morbidity | कोरोना रुग्णसंख्या कमी होऊनही तिसरा टप्पा कायम

कोरोना रुग्णसंख्या कमी होऊनही तिसरा टप्पा कायम

Next

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटि रेट व रुग्णालयात ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा आढावा घेऊन निर्बंध शिथिलतेचे अधिकार शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ११ ते १७ जून या कालावधीत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी रेट ४.३९ टक्के इतका असून, ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याचे प्रमाण ९.०३ टक्के इतके आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा दुसऱ्या टप्प्यातील निर्बंधांसाठी पात्र ठरत आहे. मात्र दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्यावाढीचा अनुभव व ग्रामीण भागातून नगरपालिका क्षेत्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच अत्यंत काठावर असलेला पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची बदलत जाणारी उपलब्धता पाहता नाशिक जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे.

प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १९) घेण्यात आली. त्यात उपरोक्त विषयांवर चर्चा करण्यात आली. तथापि, रुग्णसंख्येत होणारी घट पाहता सोमवारपासून (दि.२१) सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीसप्रमुख सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, वासंती माळी, नीलेश श्रिंगी आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट====

अशी असेल मॉलला परवानगी

शॉपिंग मॉलच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली असून, मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे मॉलचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांचे लसीकरण करून घेणे व खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर तसेच तापमानाचे मोजमाप घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शनिवार, रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनला मॉल बंद राहील.

Web Title: The third phase persisted despite the reduction in corona morbidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.