पंचवटीला तिसऱ्यांदा उपमहापौरपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:32 AM2019-11-23T00:32:50+5:302019-11-23T00:33:23+5:30
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर निवडणुकीत पंचवटीतील भाजप नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रूपाने पंचवटीला तिसऱ्यांदा उपमहापौरपद मिळाले आहे.
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर निवडणुकीत पंचवटीतील भाजप नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रूपाने पंचवटीला तिसऱ्यांदा उपमहापौरपद मिळाले आहे. त्यामुळे पंचवटीकरांच्या आशा उंचावल्या असून, अडीच वर्षांपूर्वी रंजना भानसी यांच्यामुळे पंचवटीला महापौरपद मिळाले होते. राज्यात शिवसेना-भाजप युतीत झालेल्या काडीमोडानंतर नाशिक महापालिकेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असतानाही विरोधकांकडे महापौर तसेच उपमहापौरपद जाईल, असे बोलले जात असताना शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौर म्हणून श्रीमती भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बागुल यांच्या रूपाने पंचवटीला तिसºयांदा उपमहापौरपद मिळाले आहे. यापूर्वी माजी आमदार बाळासाहेब सानप, तर त्यांच्यानंतर विद्यमान नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी नाशिक उपमहापौरपद भूषविले होते. बागुल या नाशिक मनपातील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक आहे. सुरुवातीला शिवसेना व त्यानंतर भाजप पक्षात प्रवेश करून बागुल आतापर्यंत दोन वेळा पंचवटीतून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. बागुल या पंचवटी विभागातील पहिल्या महिला उपमहापौर ठरल्या आहेत. बागुल यांनी आतापर्यंत नगरसेवक पदा व्यतिरिक्त कोणतेही पद भूषविलेले नव्हते. बागुल यांचा मुलगा संजय बागुल यांनी मनपा स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे.