दिंडोरी तालुक्यातील ३२ गावांची तहान भागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 10:57 PM2022-05-23T22:57:04+5:302022-05-23T22:58:18+5:30
दिंडोरी : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील ३२ गावांच्या नळपाणी पुरवठा योजना कामांचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ढकांबे येथे सोमवारी (दि.२३) झाला.
दिंडोरी : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील ३२ गावांच्या नळपाणी पुरवठा योजना कामांचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ढकांबे येथे सोमवारी (दि.२३) झाला.
केंद्र शासनाचा प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या ' हर घर जल' या संकल्पूर्तीचे काम वेगात सुरू असून, दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावात जलजीवन योजनेचा लाभ दिला जाईल, असे डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले. पहिल्या टप्प्यात ३२ गावांमध्ये २५.२७ कोटींची पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू होत आहे. पुढील टप्प्यात ४० गावांमध्ये ४० कोटींची पाणीपुरवठा योजना करण्यात येऊन केंद्र सरकारच्या हर घर जल अभियान यशस्वीरीत्या पूर्ण केले जाईल. कोरोनाकाळात केंद्राने खूप मोठे कार्य केले. सध्या १९१ कोटी लसीकरण पूर्ण झाले असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार पंकज पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, कृषी अधिकारी विजय पाटील, पाणीपुरवठा उपअभियंता ए.बी पाटील, रेशन दुकानदार फेडरेशन संघटनेचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बोडके, भाजप तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, पं. समितीचे माजी सदस्य शाम बोडके, तालुका सरचिटणीस योगेश तिडके, युवा नेते योगेश बर्डे, रुपेश शिरोडे, रणजित देशमुख आदींसह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बीजपेरणी प्रात्यक्षिक करून दाखविले. सूत्रसंचालन लक्ष्मण गायकवाड यांनी केले.
पहिल्या टप्प्यात या गावांचा समावेश
जलजीवन मिशन अंतर्गत दिंडोरी तालुक्यात पहिल्या टप्प्यातील योजनेत जांबुटके, फोफशी, पिंप्री अंचला, धाऊर, लोखंडेवाडी, अंबानेर, टेटमाळ, सोनजांब, कोऱ्हाटे, शिवनई, निळवंडी, अंबाड पालखेड बं. , रवळगाव, ननाशी, करंजवण, ढकांबे, दहेगाव, चारोसा, करंजाळी, तिसगाव, चाचडगाव, नळवाडी , दगडपिंप्री, जोपूळ, वणी खुर्द, मानोरी, खडकसुकेणे, खडकसुकेणे, बोपेगाव, कोचरगाव, दहिवी, पळसविहीर आदी गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे.