स्वखर्चातून दोन महिन्यांपासून भागावताहेत गावाची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 04:19 PM2018-05-23T16:19:09+5:302018-05-23T16:19:09+5:30
सिन्नर : टंचाई असूनही नियमांचा बाऊ करीत टॅँकर मंजूर होत नसल्याने ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील घोटेवाडीच्या सरपंच कल्पना खामकर व त्यांचे पती समाजिक कार्यकर्ते किशोर खामकर यांनी पुढाकार घेतला आहे.
सिन्नर : टंचाई असूनही नियमांचा बाऊ करीत टॅँकर मंजूर होत नसल्याने ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील घोटेवाडीच्या सरपंच कल्पना खामकर व त्यांचे पती समाजिक कार्यकर्ते किशोर खामकर यांनी पुढाकार घेतला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून त्यांनी स्वखर्चातून घोटेवाडी गावात आणि वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरु केला असून ग्रामस्थांची तहान भागवत आहे. त्यासाठी त्यांचे आजपर्यंत लाखभर रुपये खर्च झाले असले तरी गावासाठी त्यांनी दाखविलेले दायित्व दुष्काळाच्या चटक्यावर फुंकर घालणारे आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व नाशिक आणि अहमदनगर जिल्'ाच्या सरहद्दीवर सुमारे २ हजार लोकसंख्या असलेले घोटेवाडी गावात जलयुक्त शिवाराचे कामही मोठ्या प्रमाणात झाले. तरीही गेल्या पाच-सहा वर्षात पाऊस कमी झाल्याने बंधारे पावसाळ्यातही कोरडेठाक राहिले आहेत. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी फुलेनगर येथील बंधाऱ्यात खोदलेल्या विहिरीसही शाश्वत पाणी नसल्याने फेब्रुवारी संपताच ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. टंचाईस्थिती जाणून घेत शासनाने या भागात टॅँकरने पाणीपुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र, परिसरातील शेतकºयाच्या विहिरीत असलेले अर्धा फुट पाणीही टॅँकर मजुरीस अडथळा ठरले. सरपंच कल्पना खामकर यांनी व त्यांचे पती किशोर खामकर यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून तो अंमलात आणला. पडीक विहिरीतील दूषीत पाणी ग्रामस्थांना पाजण्याऐवजी सरपंच कल्पना खामकर यांनी पती किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी पदरमोड केली आहे. पाथरे परिसरातून २० हजार लिटर क्षमतेचा टॅँकर भरुन आणून तो फुलेनगर बंधाºयातील पाणी पुरवठा विहिरीत ओतला जातो. आठवड्यात अशा प्रकारे पाच खेपा टाकल्या जातात. हे पाणी पंपाद्वारे उचलून नळांद्वारे गावात सोडण्यात येते. याशिवाय ग्रुप ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या शेजारील वल्वेवाडी गावासोबतच घोटेवाडी वस्त्यांनाही गरजेनूसार टॅँकर पाठवून तेथील ग्रामस्थांची तहान भागविली जाते. खामकर दांपत्याने घेतलेल्या पुढाकाराने पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण काही अंशी थांबली आहे. गावालगतच्या वस्त्यांवर असणारे पाणी साठे जनावरांची तहान भागविण्यासाठी पुरेसे नसल्याने तेथे देखील टॅँकर पुरविला जातो.