13 हजार परप्रांतिय मजुरांची एसटीने रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 04:49 PM2020-05-17T16:49:06+5:302020-05-17T16:49:56+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले.
नाशिक : देश व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच जागोजागी अडकून पडलेल्या व नाशकात आश्रय घेतलेल्या सुमारे तेरा हजार परप्रांतिय मजुरांना एसटी बसने त्यांच्या राज्याच्या सिमेवर पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार साधारण सुरूवातीचे पंधरा दिवस नागरिकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आहे तेथेच आसरा घेतला. त्यानंतर मात्र त्यांचा धीर सुटू लागल्याने त्यांनी घराचा रस्ता धरला. या काळात सर्व प्रकारचे वाहने बंद असल्याने मजुरांनी व विशेषत: परप्रांतिय नागरिकांनी पायीच मार्गक्रमण सुरू केले. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर या मजुरांची अडवणूक करण्यात येवून त्यांची रवानगी ठिकठिकाणच्या निवाराशेडमध्ये करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारे सुुमारे तेरा हजाराहून अधिक परप्रांतिय मजुरांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले असता, आता मात्र त्यांची टप्पाटप्याने रवानगी सुरू करण्यात आली आहे. महाराष्टÑ शासनाने अशा परप्रांतिय मजुरांची यादी करून त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने गेल्या आठ दिवसात ५८८ बसेसच्या माध्यमातून १२,८७५ मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले. सर्वाधिक मजुर मध्यप्रदेशच्या गोंदिया सिमेवर सोडण्यात आले असून, त्यानंतर राजस्थान, बिहार, केरळ, गुजरात, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्याच्या सिमेवर पाठविण्यात आले. काही मजुरांसाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती.