पहिल्या दिवसापासून तीस सीएनजी बस धावणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:42+5:302021-07-08T04:11:42+5:30
नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने सीटी लिंक नावाने ही सेवा सुरू करण्यात येते. प्रवाशांच्या गरजेनुसार आणि ...
नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने सीटी लिंक नावाने ही सेवा सुरू करण्यात येते. प्रवाशांच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार ही सेवा देण्यात येणार आहे. एकूण अडीचशे बस प्रति किलो मीटर या पद्धतीने चालविण्यास देणार आहेत. एकूण पन्नास पैकी दाेनशे सीएनजी, तर पन्नास डिझेल बसचा समावेश आहे. गुरुवारी (दि. ८) नऊ मार्गांवरून पन्नास बस धावणार आहेत. त्यातील तीस बस सीएनजी असणार आहेत. मनपाच्या बस कंपनीने दोन ठेेकदारांना दिलेल्या बसपैकी ट्रॅव्हल टाईम कार रेंंटल प्रा. लिमच्या बस सेवा पंचवटीतील तपोवन येथून, तर सिटी लाईफचे काम सिन्नर डेपोवरून सुरू होणार आहे.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बस सेवा अत्यंत आकर्षक असणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲपसह विविध तंत्रज्ञानाधारित सुविधा असणार आहेत. तपोवन बस स्थानक, निमाणी बसस्थानक, सीबीएस तसेच नाशिकरोड आणि भगूर बस स्थानकावरून बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या सेेवेसाठी महापालिकेने किफायतशीर भाडे ठेवले असून, दोन किलो मीटरपर्यंत १० रुपये (अर्धे तिकीट पाच रुपये) अशी सुरुवात असेल. ४८ ते ५० टक्के अंतिम टप्प्याच्या प्रवासासाठी प्रौढांना ६५, तर लहान मुलांना ३५ रुपये तिकीट दर असेल.
इन्फो..
नाशिक महापालिका हद्दीच्या वीस किलो मीटर परिघात ही सेवा देण्यात येणार असून, १३९० बस थांबे असणार आहेत. या बस थांब्यावर २६० प्रवासी निवार शेड आहेत. तसेच ३५० शेड नव्याने बीओटी तत्त्वावर असतील. तसेच ८८० बस थांब्यावर खांब लावण्यात येणार आहे. त्यावर बसच्या अवागमनाची वेळ नमूद असणार आहे.
इन्फो....
ॲटोमॅटिक बस डोअर ते अनेक अत्याधुनिक सुविधा
नाशिक महापालिकेच्या बस सेवासाठी असलेल्या बस अत्याधुनिक बस असून, त्यांचे स्वयंचलीत दरवाजे आहेत. तसेच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनीक बटन, सायरन, बस थांब्याच्या संदेशासाठी एलईडी स्क्रीन अशा सुविधा असणार आहेत. तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर ठेवण्याची सुविधाही असणार आहे. इलेक्ट्रॉनिक रूट बोर्ड फलकावर बस थांब्याचे नावदेखील आहेत.
इन्फो...
तिकिटावर दिल्या जाणार सवलती
लहान मुले (० ते १२ वर्षांपर्यंत) - ५० टक्के
अंध व अपंग - ७५ टक्के
मदतनीस - ५० टक्के
इन्फो...
विद्यार्थांनाही मिळणार सवलत
सर्वसामान्य प्रवाशांना सवलतीचे पास देतानाच विद्यार्थ्यांनादेखील सवलतीचे पास देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निश्चित मार्गासाठी पास देताना तीस दिवसांसाठी भाड्यावर ५० टक्के, तर ९० दिवसांसाठी ६६.६० टक्के इतकी सवलत असेल. याशिवाय प्रौढ नागरिकांनादेखील पासबाबत सवलत देण्याची योजना आहे. एक दिवसाचा पास ७५ टक्के इतका असेल.
इन्फो...
या नऊ मार्गांवर सुरू होईल बस
नाशिक शहरातील ६३ मार्गांवर बस सेवा सुरू राहणार असून, पाच टप्प्यात संपूर्ण बस सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर ही सेवा असेल. यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बॉईस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी, सिम्बॉईस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिकरोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते अंबडगाव, नाशिकरोड ते निमाणी, नाशिकरोड ते तपोवन
इन्फो...
बस सेेवेत अडचणी येऊ नये यासाठी गाडीची स्वच्छता आणि कंडिशन तपासणी, तसेच चालक गणवेशात आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. तसेच तपोवन, निमाणी, सीबीएस, नाशिकरोड आणि भगूूर या पॉईंटवर बस स्कॅन केली जाईल. त्याच सेवा फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी १६ मार्ग तपासणी पथके तयार करण्यात आली आहे. एका पथकात तीन कर्मचारी काम करणार असून, विना तिकीट बस प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि वाहकाकडून दंड वसूल केला जाईल. यात हा कमाल दंड तीनशे रुपये व ५४ रुपये जीएसटी याप्रमाणे राहील.