थर्टी फर्स्ट : अभयारण्यांसह गड-किल्ल्यांवर मुक्काम कराल तर शिक्षा भोगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 04:49 PM2019-12-29T16:49:04+5:302019-12-29T16:56:47+5:30
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही
नाशिक : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हैशी पर्यटकांचा हैदोस रोखण्यासाठी नाशिक वन-वन्यजीव विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली वनपाल, वनरक्षकांचे विशेष गस्ती पथके कार्यान्वित केली आहे. तसेच सुर्यास्तानंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे प्रभारी मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे.
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही, असे वन्यजीव विभागाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. तसेच विभागातील विविध गड-किल्ले तसेच पायथ्यांभोवती असलेल्या राखीव वनांमध्येही मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
३१डिसेंबरची रात्र साजरा करण्यासाठी हौशी पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्र, गड-किल्ले, धरणकिनारे अशी ठिकाणे निवडू नये, जेणेक रून कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडणार नाही. रात्रीच्यावेळी अभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांचा धोका अधिक वाढलेला असतो. तसेच गड-किल्ल्यांच्या परिसरातदेखील अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सुजाण पर्यटकांनी वन्यजीव व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांसह दुर्गप्रेमींनी अभयारण्य व गड-किल्लयांच्या परिसरातून सुर्यास्ताअगोदरच निघून जावे. संध्याकाळनंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर थांबू नये, अन्यथा नाशिक मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव संरक्षकांच्या आदेशानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७नुसार कारवाई करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. नाशिक वन्यजीव विभागांतर्गत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा समावेश होतो. या अभयारण्यक्षेत्रात भंडारदरा धरणाभोवतालची सांदण दरी, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुतखेल, रतनवाडी आदि गावे येतात. या सर्व गावांच्या परिसरात थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांचा लोंढा वाढलेला असतो. मात्र पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्रात रात्रीचा मुक्काम टाळावा तसेच रात्री या भागात वाहनांची गर्दी करू नये. कुुठल्याहीप्रकारे धुम्रपान, मद्यप्राशन, बारबेक्यू अभयारण्यक्षेत्रात पेटविण्यावर कायद्याने निर्बंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्यटकांनी हुल्लडबाजी टाळावी, जेणेकरून वन्यजीवांना धोका पोहचणार नाही. तसेच वनसंपदाही सुरक्षित राहण्यास मदत होईल. येथील हैदोसवर राजूर पोलीस ठाणे, वन-वन्यजीव विभागासह, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या सदस्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.