परिचारिकापदासाठी साडेतेराशे अर्ज
By admin | Published: April 16, 2015 12:36 AM2015-04-16T00:36:07+5:302015-04-16T00:36:32+5:30
आरोग्य अभियान : महापालिकेत महिला उमेदवारांची गर्दी
नाशिक : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याने उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत पालिकेत अर्ज छाननीचे काम सुरू होते. गुरुवारी (दि.१६) वैद्यकीय अधिकारीपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या वतीने शहरी भागात पायाभूत सुविधा देण्यासाठी शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. त्यात नाशिक शहराचा समावेश आहे. महापालिकेने यासंदर्भात तयार केलेला आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अभियानांतर्गत नवीन रुग्णालयांपासून शहरी आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी वैद्यकीय विभागात सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. त्यांचे वेतन राज्य शासन देणार आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या ७ एप्रिलपासून भरतीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. बुधवारी परिचारिकापदासाठी महापालिकेत अर्ज मागवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच अर्ज स्वीकारण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक उमेदवार आपल्या कुटुंबीयांसह आले होते. पालिकेत त्यासाठी विशेष मदत कक्ष उभारण्यात आला होता. अनेक उमेदवारांनी आपली लहान मुलेदेखील आणली असल्याने त्यांना सांभाळण्याची कसरत करीत ते पालिकेच्या भरतीप्रक्रियेत सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांची अर्जांची स्वीकृती आणि छाननी याविषयीची कार्यवाही महापालिकेने नियुक्त केलेल्या पॅनलमार्फत सुरू होती. परिचारिकापदासाठी सुमारे साडेतेराशे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड आणि उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. गुरुवारी (दि.१६) पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज स्वीकृती आणि छाननी सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)