जिल्ह्यात ३६ गावे तहानलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:00 AM2017-08-24T01:00:01+5:302017-08-24T01:00:06+5:30
नाशिक : जिल्ह्यात पाऊस पडूनही चार तालुक्यांतील ३६ गावे तहानलेली असून, त्यासाठी तेरा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी मात्र जुलै महिन्यातच जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने टॅँकर बंद करण्यात आले होते. उन्हाळ्यात भेडसावणाºया पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी यंदा फेब्रुवारीपासूनच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मार्च महिन्यापासून टॅँकरच्या संख्येत वाढ झाली. शासनाने प्रारंभी जूनअखेर टॅँकर सुरू करण्यास अनुमती दिली, मात्र जिल्ह्णात जूनमध्ये पावसाला जरी सुरुवात झाली असली तरी, पूर्व भागातील सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई कायम होती. परिणामी ३० जूननंतरही टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू ठेवण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला परंतु मालेगाव, सिन्नर, नांदगाव व बागलाण या चार तालुक्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या गावांमध्ये टंचाई होती तेथे टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. दरम्यान, प्रशासनाने संबंधित प्रांतांना पाणीटंचाईची खात्री करण्याच्या सूचना करून तसा अहवाल मागविला व त्यानुसारच टॅँकर सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
सध्या जिल्ह्णातील मालेगाव, नांदगाव, बागलाण व सिन्नर या चार तालुक्यामध्ये अद्यापही ३६ गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. त्यासाठी १३ टॅँकर सुरू करण्यात आले असून, सर्वाधिक आठ टॅँकर बागलाण तालुक्यात आहेत. तर सिन्नरला तीन व नांदगाव, मालेगावी प्रत्येकी एक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी जुलैअखेर जिल्ह्णातील सर्व टॅँकर बंद करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी जिल्ह्णात सर्वदूर पाऊस होऊनही टंचाईग्रस्त गावांचा पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही.