साडेसात लाखांची धाडसी घरफोडी
By Admin | Published: May 23, 2017 01:55 AM2017-05-23T01:55:08+5:302017-05-23T01:55:25+5:30
इगतपुरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंद बंगल्याला रात्रीच्या वेळी लक्ष्य करत चोरट्यांनी शनिवारी कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सात लाख ४३ हजार रुपयांची घरफोडी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॉन्व्हेंट शाळेजवळ बंद बंगल्याला रात्रीच्या वेळी लक्ष्य करत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्याचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास सात लाख ४३ हजार रुपयांची घरफोडी केली. यावेळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाची मदत घेण्यात आली, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. याबाबत रविवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उच्चभ्रू वस्तीत कॉन्व्हेंट शाळेजवळ महात्मा गांधी हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राध्यापक ओमप्रकाश तिवारी यांचे निवासस्थान आहे. एकत्रित कुटुंब असलेल्या या बंगल्यात ओमप्रकाश हे खालच्या मजल्यावर व त्यांचा भाऊ कैलास हे वरील मजल्यावर राहतात. भाचीच्या लग्नानिमित्त ही दोन्ही कुटुंबे मुंबईला गेली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी या बंगल्याला लक्ष्य केले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व दारांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून ओमप्रकाश यांच्या घरातील सुमारे एक लाख रुपये रोख व एक लाख चार हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कैलास यांच्या घरातील रोकडसह २ लाख ७० हजार रु पयांचे दागिने अशी एकूण पाच लाख ४० हजार व ओमप्रकाश यांच्या घरातून दोन लाख चार हजार अशी एकूण सात लाख ४३ हजार रुपयांची चोरी करु न अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी रविवारी दुपारी तिवारी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय घोगरे यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, इंगळे आदी करीत आहेत.