मेरीच्या जंगलात मोरांची भागतेय तृष्णा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:00 AM2019-05-11T00:00:06+5:302019-05-11T00:05:53+5:30
पंचवटीमधील मेरी परिसरात असलेल्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यामागे वेगवेगळी कारणे असून, जे मोर शिल्लक राहिले आहेत त्यांच्यापुढे आपली तहान भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता;
नाशिक : पंचवटीमधील मेरी परिसरात असलेल्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यामागे वेगवेगळी कारणे असून, जे मोर शिल्लक राहिले आहेत त्यांच्यापुढे आपली तहान भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र गिव्ह फाउण्डेशनने घेतलेल्या पुढाकारामुळे मोरांना आपली तहान भागविणे सोपे झाले आहे.
मेरीमधील वृक्षराजींच्या सान्निध्यात बागडणारे मोर पाण्यावाचून परिसरात भटकंती करीत झोपडपट्टीमध्ये शिरकाव करीत होते, कारण जीव कोणताही असो उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याची काहिली होते; मनुष्यप्राणी बुद्धिमान मानला जातो त्यामुळे तो आपल्या बुद्धीने उन्हाच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करताना दिसतो; मात्र मुक्या जिवांना आपल्या वेदना मांडता येत नाही आणि उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करतानाही मर्यादा येतात.
या भागात जलसंपदा विभागाचे कार्यालय आहे व वृक्षराजीचा परिसरही त्यांच्याच अखत्यारित येतो. पाण्याचे नळ जरी असले, तरी वृक्षराजीच्या या विस्तीर्ण परिसरात पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्यामुळे मोरांची उन्हाच्या तीव्रतेने जीवाची काहिली होत होती, ही बाब नाशिकमधील गंगापूररोड येथील पर्यावरणप्रेमी गिव्ह फाउण्डेशन या संस्थेच्या लक्षात आले. संस्थेचे प्रमुख रमेश अय्यर यांनी शहरातील काही युवा वन्यजीवप्रेमींची मदत घेऊन तत्काळ या वृक्षराजीच्या परिसरात सीमेंटची मोठ्या आकाराची भांडी उपलब्ध करून दिली. या भांडणामध्ये येथील कामगारांनी पाणी भरण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारली, पाणी उपलब्ध होतेच; मात्र ते साठविण्याची व्यवस्था नसल्याने मोरांना तहान भागविता येत नव्हती. सीमेंटची मोठी भांडी मिळाल्यामुळे ती दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पाण्याने भरावी लागतात, एकूणच सातत्याने पाणी भरण्याचादेखील त्रास कर्मचाऱ्यांना होत नसल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. या संपूर्ण परिसरामध्ये सुमारे दहा ते पंधरा मोर नर मादी नजरेस पडतात. गिव्ह फाउण्डेशनने याबाबत दखल घेऊन या परिसरासाठी पाण्याची मोठी भांडी देऊ केल्याने आता मोरांची तहान भागविण्याचा प्रश्न सुटला आहे. वन्यजीव प्रेमी देविका भागवत, सुखदा गायधनी, रिशिका चंदा, राहुल कुलकर्णी अभिजित खेडलेकर, ट्विंकल मेतकर आदी अधूनमधून या परिसरात भेट देऊन मोरांना खाद्य पुरविण्याचा प्रयत्न करतात. तसेच सीमेंटच्या भांड्यांमध्ये पाणीही भरतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरातील मोरांचे वास्तव्य असलेली ठिकाणे शोधून तेथे पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भागवत यांनी सांगितले.
विविध पक्षांची भागते तहान
मेरीमधील वृक्षराजी या परिसरात मोरांचे वास्तव्य आहे असे नाही तर चिमणीपासून सातभाई, भारद्वाज, धनेश, बुलबुल, पोपट, मैना, साळुंकी, टिटवी, घुबड, घार, कावळे आदी पक्षी आपली तहान येथील सीमेंटच्या भांड्यांमध्ये भरलेल्या पाण्यावर भागवितात, असे येथील कामगारांनी सांगितले.