मालेगावी ३५० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:35 AM2019-03-22T00:35:01+5:302019-03-22T00:36:03+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नाकाबंदी, कोंबिंग आॅपरेशन राबविले जात आहे.
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नाकाबंदी, कोंबिंग आॅपरेशन राबविले जात आहे.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे.
शहर पोलीस उपविभागातील ९ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस प्रमुख व प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत, तर ११० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यापूर्वी शहर उपविभागातून २५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित ११ प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कॅम्प पोलीस उपविभागातील सहा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर सुमारे २४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या पाच हद्दपारीच्या प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. शहर व कॅम्प विभागात पोलिसांकडून कोंबिंग आॅपरेशन, नाकाबंदी केली जात आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहेत. चौकाचौकांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस हॉटेल्स, बिअरबार यांचीही तपासणी केली जात आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्याला कोठडी
शहरातील रजा चौक भागात अवैधरीत्या पिस्तूल बाळगणाºया इम्रानखान अताउल्लाहखान ऊर्फ शेट्टी याला पवारवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेट्टी याला यापूर्वी बºहाणपूर पोलिसांनी आठ लाखांच्या घरफोडीत अटक केली होती. १३ मार्चला जामिनावर सुटका झाल्यानंतर शेट्टी हा पिस्तूल बाळगताना पोलिसांना आढळून आला. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.