शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 09:01 AM2024-05-18T09:01:39+5:302024-05-18T09:03:24+5:30
दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : कांदा विषयावर मत मागायचे तर स्वतंत्र सभा घ्या. तुमच्या व्यासपीठावरून तो प्रश्न मांडा. पंतप्रधानांच्या सभेत येत गोंधळ घालण्याचा हा प्रकार शरद पवार यांच्यासारख्या जुन्या नेत्याकडून अपेक्षित नाही. ती आपली संस्कृती नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कांद्याबद्दल भावना व्यक्त करणे गैर नाही. मात्र, दुसऱ्याच्या कार्यक्रमात असा गोंधळ चांगला नाही. पवार यांच्यासारख्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्यांची पाठराखण करण्याचा प्रकारही योग्य नाही. राज ठाकरे आमच्यासोबत आल्यामुळे काहींना पोटदुखी झाली आहे. त्यातून वडेट्टीवार यांनी राज यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताचाही महाजन यांनी इन्कार केला.
भुजबळ नाराज नाहीत...
छगन भुजबळ नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. महायुतीच्या प्रचारात ते सहभागी आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेत त्यांचे तडाखेबंद भाषण झाले. त्यामुळे ते नाराज आहेत असे कसे म्हणता येईल, असा प्रश्नही महाजन यांनी विचारला.
सभेत घोषणाबाजी करणारा ‘तो’ पवारांच्या भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांद्यावर बोला, असे ओरडल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या किरण सानप या युवकाने नाशिकला मुक्कामी असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवार हे नाशिकच्या हॉटेल एमराल्ड पार्कमध्ये मुक्कामी असल्याचे सानप याला समजले. त्यामुळे त्याने गुरुवारी पवार यांची भेट घेऊन त्यांना घटनाक्रम सांगितला. भाषणादरम्यान कांद्यावर बोला, असे म्हटल्यानंतर दुसऱ्याच क्षणी पोलिसांनी ताब्यात घेत त्याचा फोनही जप्त केल्याचे त्याने सांगितले. २०१९ पासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरी सभेत शेतकरी म्हणून गेलो असल्याचे सानप यांनी सांगितले.