लोहिया पतसंस्थाचालकांचा नोटांसाठी ‘ठिय्या’
By Admin | Published: November 18, 2016 12:38 AM2016-11-18T00:38:54+5:302016-11-18T00:42:09+5:30
चार तासांचे ठिय्या आंदोलन, बॅँकांची सुनावणी रद्द
नाशिक : जिल्ह्यात पतसंस्था आणि जिल्हा बॅँकेत चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारत नसल्याने सभासदांचे हाल झाले आहेत. रोजच्या रोज उदरनिर्वाहाची चिंता असलेल्या शेकडो सभासदांची रक्कम पतसंस्थेत अडकली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१७) राम मनोहर लोहिया पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधकांच्या कार्यालयात चार तास ठिय्या मांडत पैशाची मागणी केली. चार तासांच्या ठिय्या आंदोलनाची सांगता लेखी आश्वासन मिळाल्यानंतर झाली.
केंद्र सरकारने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप या पतसंस्थेच्या पदाधिकारी व सभासदांनी केला आहे. नागरी सहकारी पतसंस्थांना नोटा स्वीकारण्यास बंदी अथवा वितरणास पूर्णत: बंदी घातल्याने त्यांचे व्यवहार ठप्प आहेत.