थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार
By admin | Published: February 1, 2015 12:10 AM2015-02-01T00:10:16+5:302015-02-01T00:11:03+5:30
सार्वजनिक वाचनालय : ८ रोजी वितरण सोहळा
नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार संगमनेरचे आमदार व राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते थोरात यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. (पान २ वर)
माजी आमदार, लेखक व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. कै. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर व त्यांचे पती डॉ. विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कार निवडीसाठी गठित केलेल्या समितीने थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत विधान परिषदेचे आमदार जयप्रकाश छाजेड, गावकरीचे संपादक वंदन पोतनीस, डॉ. विनायक व डॉ. शोभा नेर्लीकर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांचा समावेश होता.
कार्यक्षम लोकप्रतिनिधींचा गौरव करून त्यांना समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन २००३ पासून सदर पुरस्कार दिला जातो.