‘त्या’ हौशी रंगकर्मींना नाट्य परिषद विचारणार जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:19 AM2018-12-13T01:19:45+5:302018-12-13T01:20:03+5:30
नाशिकमधील ५८ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही हौशी रंगकर्मींनी आणि नाट्य संस्थांनी या निकालावर आक्षेप घेतला.
नाशिक : नाशिकमधील ५८ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही हौशी रंगकर्मींनी आणि नाट्य संस्थांनी या निकालावर आक्षेप घेतला. तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेवर निकालात ढवळाढवळ करीत वशिलेबाजी केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप नाट्य परिषदेने फेटाळला असून, तो चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा म्हटले आहे. तसेच नाट्य परिषदेचे सभासद असलेल्या त्या रंगकर्मींना याबाबत जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ‘त्या’ नाट्यकर्मींनी नाट्य परिषदेवर केलेले आरोप ऐकून आम्ही व्यथित झालो. त्यांनी यासंबंधी आरोप करण्यापूर्वी आमच्या समवेत चर्चा करायला हवी होती. तसेच त्या रंगकर्मींनी परीक्षकांवर केलेले आरोपही चुकीचे आहेत. कारण परीक्षक हे शासनाच्या परिपत्रकानुसार नेमण्यात आलेले असतात. त्यांच्या समवेत सर्वांची ओळख असू शकते; परंतु त्यांनी दिलेला निकाल हा निष्पक्षपाती असतो. त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. यामुळे नाट्य स्पर्धांमधील वातावरण गढूळ होऊ शकते. स्पर्धांच्या उद्घाटनाला नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना बोलविण्याबाबत शासन परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे आम्ही तेथे उपस्थित होतो, असेही प्रा. कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यवाहक सुनील ढगे, विनोद राठोड, लक्ष्मी गाढेकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.