‘त्या’ चोरट्या बनावट ग्राहकांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:48+5:302021-03-01T04:16:48+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.२६) दोघा अज्ञात संशयितांकडून दुकानात येत खरेदीचा बनाव करत चोरी ...
याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.२६) दोघा अज्ञात संशयितांकडून दुकानात येत खरेदीचा बनाव करत चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित फरार झाले होते. दरम्यान, संशयितांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील वाइन-बिअर शॉपीवरून वायफाय डेबिट कार्डाचा वापर करत सुमारे १७ हजारांची दारू खरेदी केल्याचे उघडकीस आले. पोलीस नाईक आव्हाड व शिपाई कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे संशयित अनुप भारती व त्याचा मित्र विशाल चेरे या दोघांनी मिळून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दोघेही संशयित अशोकनगर भागात येणार असल्याने पथकाने तेथे सापळा रचला. गुन्हे शोध पथकाने राहत्या घरामधून संशयित अनुप यास चौकशीसाठी प्रथम ताब्यात घेतले. त्यास पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने इंदिरानगरमध्ये घडलेल्या गुन्ह्याची कबुली देत साथीदार विशालसोबत मिळून रक्कम आणि वायफाय एटीएम डेबिट कार्ड लांबविल्याचे सांगितले. सातपूर पोलीस ठाण्याच्या यादीवरील सराईत गुन्हेगार जावेद ऊर्फ साजन सलाऊद्दीन अन्सारी (२४,रा. वास्तुनगर, सातपूर) व त्याचा साथीदार अमजद आसिफउल्ला खान (२७, रा.म्हाडा बिल्डिंग, सातपूर) या दोघांनी मिळून गंगापूररोडवरील एका दुकानातून दारू खरेदी केल्याचे समोर आले. या गुन्ह्यात चौघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अन्सारी व खान यांनाही बेड्या ठोकल्या. या चौघांनी मिळून विविध ठिकाणाहून दारूची खरेदी करत पार्टी रंगविली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वायफाय कार्ड, पल्सर दुचाकी (एम.एच१५ जीई, ७६३४) पोलिसांनी जप्त केली आहे. या चौघांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.