मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

By admin | Published: January 3, 2017 11:38 PM2017-01-03T23:38:45+5:302017-01-03T23:39:08+5:30

काहींना घरवापसीचे वेध : उमेदवारीबाबत वाढली स्पर्धा

Those who quit the MNS again 'no entry'? | मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

मनसे सोडणाऱ्यांना पुन्हा ‘नो एण्ट्री’?

Next

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत सेना-भाजपाशी घरोबा केला आहे. परंतु, आता सेना-भाजपात मनसेतून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने संबंधित दलबदलूंना घाम फुटला आहे. त्यातून काही नगरसेवकांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले असले तरी मनसेने मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा दारात उभे न करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात काहींची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे सुरू आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा सत्ताधारी मनसेला बसला आहे. मनसेच्या आतापर्यंत एका स्वीकृत सदस्यासह तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यात मनसेचे सर्वाधिक १६ सदस्य हे शिवसेनेत तर उर्वरित १० सदस्य हे भाजपात दाखल झालेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेनेच सदर सदस्यांनी पक्षांतर केलेले आहे, तर अनेकांना उमेदवारीबाबत शब्द दिला नसल्याचे सेना-भाजपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  मनसेतून सेना-भाजपात दाखल झालेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत आता दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला आहे. काही नगरसेवकांची पुन्हा निवडून येण्याची क्षमताच नसल्याचेही वरिष्ठ स्तरावर पटवून दिले जात आहे. त्यामुळे, मनसेतून गेलेल्या सर्वांनाच पुन्हा उमेदवारी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. त्यातच, काही नगरसेवकांनी सेना-भाजपात तिकिटासाठी वाढती स्पर्धा पाहून उमेदवारी मिळण्याबाबत धसका घेतला आहे. त्यांची अवस्था केविलवाणी बनली असून, पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. परंतु, मनसेने मात्र आता पक्षाशी गद्दारी करून बाहेर गेलेल्यांना पुन्हा दरवाजे बंद असल्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे संबंधितांची घरवापसी अशक्य बनणार आहे. परिणामी, त्यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लटकले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Those who quit the MNS again 'no entry'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.