फळभाज्या आवक वाढली असली तरी बाजारभाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:10 AM2017-08-27T01:10:38+5:302017-08-27T01:10:50+5:30
नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच परबाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत व्यवहार पुर्ववत झाल्याने दुपारी फळभाज्यांची मोठया प्रमाणात आवक आली होती.
बाजारसमितीत काकडी, दोडका, ढोबळी मिरची, कारले, वांगी, टोमॅटो आदिंसह विविध फळभाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. काही दिवसांपुर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या फळभाज्यांना समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी काहीसी नाराजी व्यक्त केली. 20 किलो वजनी जाळी असलेल्या कारल्याला 7 ते 8 रूपये, तर काकडी 10 ते 15 रूपये प्रति किलो दराने विक्री झाली. वांगी 20 रूपये किलो, दोडका 18 ते 20 रूपये व ढोबळी मिरची 17 ते 19 रूपये किलो दराने विक्री झाली.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यातच एकीकडे आवक वाढल्याने व त्यातच मुंबईसह अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरले असल्याची माहिती बाजारसमितीतील व्यापारी उमापती ओझा यांनी दिली आहे. पावसाचा जोर वाढल्यास बाजारपेठेत शेतमालाला उठाव मिळणार नाही त्यामुळे बाजारभाव पुन्हा ढासळण्याची शक्यता आहे.