चांदवडला आजपासून भुसार मालाचे लिलाव
By Admin | Published: November 3, 2015 09:58 PM2015-11-03T21:58:42+5:302015-11-03T21:59:42+5:30
चांदवडला आजपासून भुसार मालाचे लिलाव
चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी भुसार माल विक्रीची जवळच सोय उपलब्ध व्हावी व वेळ, खर्चाची बचत व्हावी याकरिता मुख्य बाजार आवार, चांदवड येथे बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता भुसार मका, सोयाबिन, गहू, बाजरी आदि शेतमालाच्या नियमित लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते होणार आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मका, सोयाबिन, बाजरी काढणीचा हंगाम सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांना
भुसार माल विक्रीची जवळची सोय उपलब्ध व्हावी याकरिता भुसार शेतमालाचे लिलाव सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या अध्यक्षतेखाली भुसार आडते, खरेदीदार व्यापारी यांची सभा घेण्यात आली. सदर सभेत चांदवड येथील मुख्य बाजार आवारात भुसार मालाचे लिलाव दि. ४ नोव्हेबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपसभापती नितीन अहेर, भुसार व्यापारी गणेश वाघ, राजेंद्र अजमेरे, विष्णू शिंदे, अंकुर कासलीवाल, प्रशांत सोनवणे, संतोष जाधव, पुंजाराम हांडगे आदि उपस्थित होते. भुसार शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाणार आहे. (वार्ताहर)