एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:56 PM2020-10-23T22:56:05+5:302020-10-24T02:50:44+5:30
नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड ...
नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड यांच्यामार्फत महाओनियन प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या वतीने नायगाव-सिन्नर रस्त्यावर एक हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या कांदा साठवणूक गृह, प्रतवारी विभाग, वजनकाटा केंद्राची उभारणी झालेला देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. पायाभूत सुविधांनी साकारलेल्या प्रकल्पात कांद्याची प्रतवारी व योग्य दरासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प शुभ वर्तमान ठरत आहे.
एक हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमतेच्या या प्रकल्पाचे ऑनलाइन लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक सुविधांमुळे तसेच चांगल्या प्रतवारी आणि दर्जेदार कांदा पिकाला आंतरराज्य बाजारपेठेत व्यापाराची संधी व सुविधा उपलब्ध होणार
आहेत.
१ हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक करणाऱ्या गोदा-दारणा शेतकरी उत्पादक संस्थेला नाफेडकरिता कांदा खरेदी करण्याची मुभा असल्यामुळे या ठिकाणी परिसरातील शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कांदाचाळी कमी क्षेमतेच्या असल्यामुळे हा माल तेथून नाफेडच्या गुदामाला नेण्यासाठी वाहतूक खर्च होतो. त्यामुळे नाफेडच्या गुदामामध्ये गेल्यावर प्रतवारी केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प जवळचा ठरणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी आजवर बाजार समिती हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. नाफेडच्या या साठवणूक केंद्रात कांदा खरेदी करण्यात येणार असल्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी करताना मनमानी धोरण बाजूला ठेवून स्पर्धात्मक चढाओढीने कांदा खरेदी करावी लागेल.जिल्ह्यातील या महाकाय प्रकल्पामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.