५० लाखांच्या खंडणीसाठी धमकाविणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 12:43 AM2016-01-17T00:43:16+5:302016-01-17T00:46:15+5:30
५० लाखांच्या खंडणीसाठी धमकाविणाऱ्याला अटक
नाशिक : ‘मी नाना शिंदे बोलत आहे, तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर ५० लाख मुंबईला आणून द्यावे लागतील, माझ्या पुढच्या कॉलची वाट बघा’ असे एका कर्जबाजारी परप्रांतीय संशयिताने दिंडोरीरोडवरील पेट्रोलपंपाच्या मालकाला बुधवारपासून धमकाविणे सुरू केले होते. मालकाने तातडीने सदर बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपासचक्रे वेगाने फिरवून शनिवारी (दि. १६) सकाळी शहरातील साईनगरमधून संशयित अनिल मोहन रामजियानी (२५) यास अटक केली.
पन्नास लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी गेल्या बुधवारपासून दिंडोरीरोडच्या एका पेट्रोपंप मालकाला रामजिआनी भ्रमणध्वनीवरून धमकावत होता. त्याने त्यांच्या शाळकरी मुलाला
जिवे ठार मारण्याची धमकी दिली
होती.
याबाबत व्यावसायिकाच्या कुटुंबीयाने आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे धाव घेऊन सदर प्रकार कथन केला. फरांदे यांनी तत्काळ त्यांना सोबत घेत आयुक्तालय गाठले व पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांची भेट घेऊन माहिती दिली. जगन्नाथन यांनी त्वरित गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांना याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले. (पान ७ वर)
गोरे यांनी पथकाला पाचारण करून याबाबत सर्व माहिती मिळवून संशयिताच्या त्वरित मुसक्या आवळण्याचा ‘टास्क’ दिला. बुधवारी सकाळी व संध्याकाळी संशयित रामजिआनी याने संपर्क साधून सदर व्यापाऱ्याला धमकाविले. गुरुवारी सकाळी मुंबईला येऊन रक्कम द्या, असे सांगितले. गुरुवारी सकाळी पुन्हा संशयिताने संपर्क साधत पैसे द्यावयाचे ठिकाण संध्याकाळी सांगतो असे सांगून फोन कट केला; मात्र संध्याकाळनंतर त्याने पुन्हा व्यावसायिकाशी संपर्क साधलाच नाही. पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळविण्यास प्रारंभ केला. शुक्रवारी तपास संशयिताच्या मागापर्यंत पोहचला. संशयिताने भ्रमणध्वनीचा सिमकार्ड बिहार राज्यातून घेतल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत होत्या; मात्र अखेर शनिवारी पथकाने सकाळी रामजियानी यास दिंडोरीरोडवरून साईनगर भागातून ताब्यात घेतल्याचे गोरे यांनी माहिती देताना सांगितले.
इन्फो..............
संशयित जुना कर्मचारी
पेट्रोलपंपमालक हे शहरातील व्यापारी असून, त्यांचे पंचवटी परिसरात भ्रमणध्वनी विक्रीचे दुकानदेखील आहे. खंडणीसाठी धमकाविणारा रामजिआनी हा परप्रांतीय युवक हा चार वर्षांपूर्वी त्यांच्या दुकानात कामाला होता. त्यामुळे व्यावसायिक कुटुंबाला तो बऱ्यापैकी ओळखत होता आणि त्यांच्याविषयी माहितीदेखील जाणून होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.