जात पडताळणीची हजारो प्रकरणे पडून
By admin | Published: January 30, 2015 12:23 AM2015-01-30T00:23:07+5:302015-01-30T00:23:26+5:30
जात पडताळणीची हजारो प्रकरणे पडून
नाशिक : विभागीय जात पडताळणी समितीचे प्रभारी अध्यक्षपद आणि अन्य कारणांमुळे विभागातील २० हजारांहून अधिक प्रकरणे पडून आहेत. त्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी आणि जात पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशी मागणी माकपाचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जात पडताळणीच्या कामकाजाचा वेग थंडावला आहे. विभागीय अध्यक्षपद रिक्त असल्याने अन्य अधिकाऱ्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना त्यांच्याकडील मूळ काम सांभाळून कामकाज करावे लागत असल्याने जात पडताळणी समितीकडे पुरेसे लक्ष पुरवता येत नाही. परिणामी वीस हजारांहून अधिक प्रकरणे थंड बस्त्यात आहेत.
अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात पडताळणी करून प्रकरण सादर करण्यासाठी ३१ जानेवारी रोजी मुदत देण्यात आली आहे. परंतु पडताळणीच होत नसल्याने मुदतीच्या आत प्रकरणे कशी निकाली निघणार असा प्रश्न जायभावे यांनी केला आहे.
यासंदर्भात शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जायभावे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)