पोलीस ठाण्यांमध्ये कोट्यवधींचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:28 AM2018-10-29T00:28:57+5:302018-10-29T00:29:32+5:30
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पोलिसांना शक्य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़
लोकमत विशेष
नाशिक : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पोलिसांना शक्य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ मात्र; पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी कार्यवाही सुरू केली असून, सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल लवकरच परत केला जाणार आहे़ नाशिक शहरात १३ पोलीस ठाणी आहेत. प्रारंभी भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, सातपूर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे होते़ कायदा व सुव्यवस्था तसेच वाढती लोकसंख्या यामुळे अंबड, उपनगर, इंदिरानगर, गंगापूर व आडगाव या नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली़, तर जानेवारी २०१६ मध्ये म्हसरूळ व मुंबई नाका ही आणखी दोन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली़ शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरी, चोरी, घरफोडी, लूट, चेनस्नॅचिंग, जबरी चोरी आदी प्रकारचे दरवर्षी सुमारे हजार गुन्हे नोंद होतात. पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण सुमारे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर आरोपींकडून जप्त केलेले दागिने, वस्तू न्यायालयाच्या परवानगीने तक्रारदाराला परत करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आतापर्यंत दोनवेळा मूळ मालकांना त्यांच्या वस्तू परत देण्यात आल्या असल्या तरी अजूनही बराचसा मुद्देमाल हा तक्रारदार सापडत नसल्याचे तो पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कारकुनाकडे पडून आहे़
पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकुनाची जबाबदारी
चोरीच्या गुन्ह्यात चोरांकडून जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयीन आदेश होईपर्यंत संबंधित पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कारकुनाच्या ताब्यात असतो़ या संपूर्ण मुद्देमालाच्या संरक्षणाची जबाबदारी ही या कारकुनाची असते़ या सर्व मुद्देमालाचे रेकॉर्ड ठेवणे, न्यायालयाने प्रॉपटी रिटर्नचा आदेश दिल्यानंतर संबंधित मालकाला त्याला मुद्देमाल परत करणे, त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी या कारकुनाकडे असते़ पोलीस ठाण्यातील या कारकुनाला के वळ एकच काम असत असे नाही तर पोलीस ठाण्यातील इतरही कामे त्याला करावी लागतात़ मुद्देमाल गहाळ झाल्याप्रकरणी यापूर्वी काही मुद्देमाल कारकुनांवर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत़
प्रॉपर्टी रिटर्नसाठी़़़
पोलिसांनी चोरी झालेला मुद्देमाल जप्त केल्यानंतर तो परत मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो़ या अर्जासाबत पोलीस ठाण्यात चोरीची दाखल झालेली फि र्याद, चोरी गेलेला मुद्देमाल आपलाच असल्याचे कायदेशीर पुरावे हे न्यायालयात सादर करावे लागतात़ अर्जदाराच्या अर्जानुसार न्यायालय संबंधित गुन्ह्याचा पोलीस तपास अधिकारी, सरकारी वकील तसेच काही प्रसंगी गुन्हेगारांचा म्हणणेही मागवते़ त्यानुसार कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालय आदेश देते व संबंधिताला त्याचा मुद्देमाल परत मिळतो़ यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदाराला मुद्देमाल मिळण्यास उशीर होऊ शकतो़
मुद्देमाल वर्षानुवर्षे पडून राहण्याची कारणे
चोरी वा घरफ ोडी होणाऱ्या व्यक्तीच्या मनावर सर्वांत मोठा आघात होतो़ त्याने कमावलेली आर्थिक वा वस्तूरूपी पुंजी काही तासांत लुटली जाते़ या दु:खदायी घटनेनंतर मानसिकरीत्या खचलेली ही व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन फि र्याद देते़ काही महिन्यांनंतर म्हणा वा त्याच्या कर्मधर्मसंयोगाने पोलीस गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गुन्हेगारांना हुडकून काढतात़ चोरट्यांना पकडल्यानंतर पोलीस खाक्या दाखवून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला जातो़ या मुद्देमालाच्या मालकाचा शोध घेत पोलीस त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात़ आपला मुद्देमाल सापडला याचा आनंद त्याला होत असतो़ मात्र आपला चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी त्याला भली मोठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते़
४ न्यायालयात गेल्यानंतर वकिलाची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता, पोलीस चौकशी, सरकारी वकील यांच्या प्रश्नाची उत्तरे, पुरावे असे सर्व न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याला मुद्देमाल परत मिळतो़ मात्र ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊपणाची असल्यामुळे चोरी गेलेल्या मुद्देमाल कमी किमतीचा असेल तर सरळ-सरळ याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे वर्षानुवर्षे हा मुद्देमाल पोलिसांकडे पडून राहतो़ आजमितीला कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाण्यामध्ये पडून आहे़